चाळीशी ओलांडली की अचानक वजन वाढतं, सतत विसरायला होतं...ही मेनोपॉजची तर लक्षणं नाहीत ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2023 04:45 PM2023-03-10T16:45:18+5:302023-03-10T16:50:35+5:30

Health Issues and Symptoms of Menopause : पाळी जेव्हा जायची वेळ येते तेव्हा मात्र महिलांच्या शरीरात, मनात, भावनांमध्ये असंख्य आंदोलनं होत असतात.

मेनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्ती हा महिलांच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा असतो. मुलगी वयात आल्यावर पाळी सुरू होते आणि ते शुभ असतं म्हणून याचे सेलिब्रेशनही होते. पण ही पाळी जेव्हा जायची वेळ येते तेव्हा मात्र महिलांच्या शरीरात, मनात, भावनांमध्ये असंख्य आंदोलनं होत असतात (Health Issues and Symptoms of Menopause).

साधारणपणे वयाच्या ४५ वर्षानंतर महिलांना मेनोपॉजची लक्षणे जाणवायला लागतात. पाळी बंद होते हे त्याचे ठळक लक्षण असले तरी त्यासोबत इतरही बरेच बदल होत असतात. ते कोणते आणि मेनोपॉजची इतर लक्षणे कोणती ते समजून घेऊया..

शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे महिलांचे वजन झपाट्याने वाढते. यामध्ये इस्ट्रोजेनचं प्रमाण , प्रतिकारशक्ती कमी झालेली असते आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे वजन झपाट्याने वाढतं. अचानक वजन का वाढलं म्हणून महिला मात्र टेन्शनमध्ये येतात.

साधारणपणे हे वजन मांड्या, पोट, कंबर याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र नियमित व्यायाम, सकस आहार, पुरेशी झोप अशी योग्य जीवनशैली असेल तर वजन वाढीची ही समस्या दूर राहू शकते.

Hot flashes ही मोनोपॉजच्या काळात उद्भवणारी आणखी एक महत्त्वाची समस्या आहे. शरीराचं तापमान अचानक वाढणं, छातीत धडधड होणं, घाम येणेअशी लक्षणे दिसायला लागली की मेनोपॉज जवळ आला हे लक्षात घ्यावे .

प्रचंड प्रमाणात त्रागा किंवा चिडचिड, नैराश्य ही मेनोपॉजची आणखी काही लक्षणे आहेत. यामुळे महिलांचे वैयक्तिक, प्रोफेशनल अशा सगळ्या नात्यांवर परीणाम होण्याची शक्यता असते. यामध्ये नैराश्यामुळे खूप राग येणे, रडू येणे अशाही समस्या उद्भवतात.

या काळात शरीरातील हॉर्मोन्सचे प्रमाण कमी झाल्यामुळे कॅल्शियमची कमतरता जाणवायला लागते. याचा परीणाम म्हणजे स्नायू आणि हाडं ठणकतात. काही जणींना सांधेदुखीचा किंवा हाडं ठिसूळ होण्याचा म्हणजेच ऑस्टीओपोरॉसिस होतो.