Health Test: ही घ्या हेल्थ टेस्ट, उत्तम आरोग्याची 7 लक्षणं- बघा तुम्ही सुदृढ की आजारी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2022 02:41 PM2022-04-07T14:41:20+5:302022-04-07T14:50:33+5:30

Health Tips: आरोग्याबाबत सतत काळजी करणारे काही लोक असतात.. तर काही लोक अगदीच निष्काळजी असतात. काही एवढंसं दुखलं तरी खूप काळजी घेतात तर काही मोठ्या- मोठ्या त्रासाकडे सर्रास दुर्लक्ष करतात..

यापैकी तुम्ही नेमक्या कोणत्या प्रकारात मोडता? आरोग्याची काळजी घेणं कधीही अगदी उत्तम.. पण ओळखायचं कसं की आपण एकदम ठणठणीत असून आपलं आरोग्य अतिशय उत्तम आहे ते??

त्यासाठीच तर ही घ्या तुमच्या आरोग्याची टेस्ट.. सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी एक पोस्ट नुकतीच इन्स्टाग्रामला शेअर केली असून त्यामध्ये त्यांनी उत्तम आरोग्याची ७ लक्षणं सांगितली आहेत. ''just some of the signs of good health, comes in all shapes, sizes & weight. You don’t have to lose weight to get healthy..'' असंही त्यांनी आवर्जून नमुद केलं आहे...

चला तर मग बघा ही ७ लक्षणं आणि द्या स्वत:ला गुण.... आणि ठरवा की तुम्ही आजारी आहात की सुदृढ

उत्तम आरोग्याच्या ७ लक्षणांपैकी एक आहे शांत झोप.. रोज रात्री तुम्ही मस्त ताणून देत असाल तर याचे पॉईंट्स तुम्हाला मिळाले म्हणून समजा.

दुसऱ्याला सहज क्षमा करता... हे जमण्यासाठी तुम्ही शांत, संयमी असायला हवं.. आहात का तसे तुम्ही? जमतं तुम्हाला दुसऱ्यांना सहज माफ करायला?

तिसरं लक्षण म्हणजे तुम्हाला तुमच्या जेवणाचा उत्तम आस्वाद घेता येताे.. जेवणातला आनंद अशाच व्यक्तीला शोधता येतो, जो निरोगी असतो..

दररोज व्यायाम करणं हे उत्तम आरोग्याचं चाैथं लक्षण.. रोज उत्साहाने व्यायाम करणं, व्यायाम करताना काहीही त्रास न होणं.. व्यायाम एन्जॉय करणं या सगळ्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय सकारात्मक बाबी आहेत.

उत्तम आरोग्याचं पाचवं लक्षण म्हणजे दररोज पोट व्यवस्थित साफ होणं. पचनक्रिया व्यवस्थित असेल तरच ते शक्य आहे... आणि पचन संस्थेचं कार्य जेवढं चांगलं तेवढं तुमचं आरोग्य चांगलं...

कायम हसतमुख हसता.. तुम्हालाही खळखळून हसता येतं... हसण्यामध्ये कसलं आरोग्य दडलंय? असं वाटू शकतं. पण बघा ना आपल्या आजुबाजुच्या किती व्यक्तींना खळखळून हसताना आणि छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेताना तुम्ही बघितलंय? ही वाटते तेवढी सहज- सोपी बाब नक्कीच नाही.. म्हणूनच खळखळून हसता येणं हे चांगल्या आरोग्याचं सहावं लक्षण.

जेव्हा माणूस निरोगी असताे, मानसिक दृष्ट्या मजबूत असतो, तेव्हाच तो नवं काही तरी शिकायचा प्रयत्न करू शकतो. काहीतरी नवं करून बघण्याची, शिकण्याची उर्मी तुमच्यात असेल तर उत्तम आरोग्याचं हे सातवं लक्षण तुमच्यात दिसतंय असं समजा.