लहान मुलांमध्ये वाढतेय गोवरचे प्रमाण.. ५ लक्षणांकडे मुळीच दुर्लक्ष नको, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2022 04:22 PM2022-11-17T16:22:13+5:302022-11-17T16:33:01+5:30

१. लहान मुलांमध्ये सध्या गोवर होण्याचं प्रमाण खूपच वाढत आहे. मुंबईमध्ये तर हे प्रमाण चिंताजनक असून आता पालकांनीही या आजाराबाबत सतर्क व्हावे, आजाराची लक्षणं व्यवस्थित समजून घ्यावीत, असा सल्ला डॉक्टर देत आहेत.

२. सध्या थंडीचे दिवस असल्याने सर्दी- खोकला, छातीत कफ होणे असा त्रास अनेक लहान मुलांना होतो. थंडीमुळेच सर्दी झाली असावी आणि मुलांना काय नेहमीच सर्दी होते, असं वाटून मग पालकही या त्रासाकडे फार गांभिर्याने बघत नाहीत.

३. पण गोवर झाल्यावर सुरुवातीला हीच काही लक्षणं दिसून येतात. त्यामुळे मुलांना होणाऱ्या सर्दी- खोकला, कफ अशा त्रासाकडे यादिवसांत मुळीच दुर्लक्ष करू नका.

४. याविषयी एचटी लाईफस्टाईलशी बोलताना बालरोगतज्ज्ञ डॉ. अमिन काबा म्हणाले की ताप, अंगावर रॅश येणे, कफ, नाक गळणे आणि डोळे लाल होणे ही या आजाराची प्रमुख काही लक्षणं आहे. हा आजार संसर्गजन्य असून ज्या मुलांना लहानपणी गोवरची लस दिलेली नाही, ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी आहे, अशा मुलांना याचा चटकन संसर्ग होतो.

५. डॉ. संजीव दत्ता यांनी एचटी लाईफस्टाईलला दिलेल्या माहितीनुसार या आजाराच्या सुरुवातीला मुलांना खूप जास्त ताप येतो. त्यामुळे ताप जर खूप जास्त असला, तर लगेच सतर्क व्हा. त्यानंतर पुढच्या दोन- तीन दिवसांत मुलांच्या अंगावर लाल रंगाचे पुरळ दिसू लागते.

६. लाल रंगाचे पुरळ सर्वप्रथम कानाच्या मागे आणि चेहऱ्यावर दिसू लागतात. त्यानंतर ते शरीरभर पसरतात. काही केसेसमध्ये ताेंडाच्या आतही पुरळ उठते.

७. त्यामुळे अशी लक्षणं दिसल्यास त्याकडे मुळीच दुर्लक्ष करू नका. किंवा घरगुती उपाय करण्याचा प्रयत्न करू नका. मुलांना तात्काळ डॉक्टरांकडे न्या, असा सल्लाही त्यांनी दिला. कारण आजाराचे स्वरुप वाढत गेले तर तो निमोनिया किंवा डायरिया यांच्यातही बदलू शकतो.

८. आपल्या मुलांना आपण गोवरची लस दिली आहे का, याची सगळ्या पालकांनी सगळ्यात आधी खात्री करून घ्यावी. नसेल दिली तर १६ वर्षांपर्यंतच्या मुलांना लगेचच लस देऊन घ्यावी, असंही डॉक्टरांनी सांगितलं.