संध्याकाळी भूक लागते, चटकमटक खावंसं वाटतं? खा भरपूर प्रोटीन देणारे ७ चटपटीत पदार्थ- वजनही वाढणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2024 03:31 PM2024-04-16T15:31:48+5:302024-04-16T16:30:09+5:30

दुपारचं जेवण ते रात्रीचं जेवण हा तसाच बराच मोठा गॅप असतो. त्यामुळे या मधल्या गॅपमध्ये म्हणजेच संध्याकाळी अनेकांना जाम भूक लागते. यावेळी थोडंसंच पण काहीतरी खाण्याची तिव्र इच्छा होते.

ही तुमची संध्याकाळची थोडीशीच भूक भागविण्यासाठी उगाच काहीतरी जंकफूड किंवा मैद्याचे पदार्थ खाण्यापेक्षा प्रोटीन देणारं काहीतरी खा. यामुळे आरोग्यालाही फायदा होईल आणि वजनही वाढणार नाही. असे भरपूर प्रोटीन देणारे कोणते पदार्थ तुम्ही यावेळी खाऊ शकता ते पाहा.

यापैकी सगळ्यात पहिलं आहे दूध. साखर न घातलेलं किंवा अगदी कमी साखर असणारं ग्लासभर, कपभर दूध तुम्ही तुमच्या भुकेप्रमाणे घेऊ शकता.

बदाम, अक्रोड, खजूर असा सुकामेवाही यावेळी खाणं फायदेशीर ठरेल.

केळी किंवा बनाना मिल्कशेक हा पर्यायही चांगला आहे.

मोड आलेल्या कडधान्यांची भरपूर भाज्या टाकून वाटीभर भेळ खाल्ली तरी त्यातून भरपूर प्रोटीन्स मिळतील. शिवाय भाज्यांमधून फायबर मिळेल.

दही किंवा ग्रीक योगर्ट हे पदार्थही यावेळी खाऊ शकता.

मखाना भेळ किंवा नुसता भाजून किंवा परतून घेतलेल्या मखाना लाह्यादेखील संध्याकाळची भूक भागविण्यासाठी उत्तम पर्याय आहे.

दोन तीन चमचे फुटाणे आणि त्यात थोडे मुरमुरे असं एकत्र करून खाल्लं तरी तुमची भूक भागली जाईल आणि त्यातून भरपूर प्रोटीन मिळेल.