रंग खेळायला जाताना मुलांना १० गोष्टी सांगाच, रंगाचा बेरंग टाळून मनसोक्त रंग खेळा पण.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2023 03:08 PM 2023-03-03T15:08:40+5:30 2023-03-03T15:20:07+5:30
Holi 2023 : 10 Useful Tips For Parents To Keep Their Children Safe This Holi : लहान मुलं रंगपंचमी खेळत असताना त्यांची कशी काळजी घ्यावी याबाबतीत काही टिप्स पाहूयात... होळी-धूळवड- रंगपंचमी हे सारे रंगात रंगून जाण्याचे सण. मनावरचा ताण हलका होत आपल्या आणि आपल्या जीवलगांच्या आयुष्यात रंग भरणारा हा उत्सव. मात्र रंग खेळताना रंगांचीच ॲलर्जी आली किंवा त्वचाविकार झाले तर? विशेषत: लहान मुलांची कोमल त्वचा तर लवकर बाधित होते अशावेळी काय करायचं? काय काळजी घ्यायची?(Holi 2023 : 10 Useful Tips For Parents To Keep Their Children Safe This Holi).
१. रंगांची खरेदी करताच शक्यतो नैसर्गिक, ऑरगॅनिक, तसेच मुलांसाठी वापरायला सुरक्षित असणाऱ्या रंगांचीच निवड करावी. फुलं, फळं, भाज्या, औषधी वनस्पतींपासून नैसर्गिकरित्या तयार केलेल्या रंगांचाच वापर लहान मुलांसाठी करावा. लहान मुलांसाठी केमिकल्समिश्रित होळीचे रंग वापरणे टाळा. त्यामुळे मुलांच्या स्किनवर रॅश किंवा इतर काही इजा होण्याची शक्यता असते.
२.रंग खेळायला जाताना मुलांचे संपूर्ण शरीर झाकले जाईल असेच कपडे त्यांना घालावे. एखादा जुना कपड्याचा जोड असेल जो वापरुन लगेच टाकून देता येऊ शकले अशा कपड्यांची निवड करावी. होळीच्या रंगाने माखलेले कपडे शक्यतो पुन्हा वापरणे टाळावे. मुलांचे हात व पाय दोन्ही संपूर्ण झाकले जातील असे पूर्ण बाह्यांचे टॉप व फुल पॅन्ट घालावी. जेणेकरुन मुलांच्या शरीरावर होळीचा फारसा रंग लागणार नाही.
३. होळीच्या रंगांपासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी डोळ्यांवर सनग्लासेस किंवा गॉगलस लावावा. होळीचे रंग चुकून डोळ्यांत गेले तर डोळ्यांना इजा होऊ शकते.
४. आपण आपल्या मित्र मैत्रिणींसोबत खूप धमाल, मज्जा, मस्ती करतो. ही धमाल, मस्ती करताना मुलांना थकवा येऊ शकतो. त्यांचा हा थकवा दूर करण्यासाठी त्यांना योग्य प्रमाणांत पाणी देऊन हायड्रेटेड ठेवावे.
५. लहान मुलांना व्यवस्थित सुरक्षितरीत्या रंग खेळता येईल अशी जागा निवडावी. रहदारीचे रस्ते, गजबजाट असलेले गल्लीबोळ, गर्दी असलेली ठिकाणं अशा जागेवर रंग खेळू नये.
६. पाण्याचे फुगे चेहेऱ्यावर न मारण्याचा सल्ला मुलांना द्यावा.
७. लहान मुलं आपापसांत रंग खेळत असताना त्यांच्यासोबत कोणीतरी एक मोठी समजदार व्यक्ती कायम सोबत असावी.
८. रंग खेळण्याची पद्धत मुलांना शिकवा. मुलांना नीट काळजी घेऊन हळुवारपणे रंग खेळायला शिकवा. इतरांना रंग लावताना दुखापत होता कामा नये.
९. होळीचे रंग खेळून झाल्यानंतर स्वच्छ आंघोळ करा, कान, नखं, केस याकडे विशेष लक्ष द्या.
१०. रंगांचा सण अतिशय आनंदानं साजरा करताना आपण कुणाचा अपमान करत नाही, ज्यांना रंग खेळायला आवडत नाही त्यांच्या मताचा आदरही मोठ्यांसह मुलांनी करायला हवा.