Holi Special Sweets: भारतभर फेमस असलेले होळी स्पेशल पदार्थ; पुरणपोळी ते होलिगा पाहा एकसे एक रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2022 01:23 PM2022-03-16T13:23:29+5:302022-03-16T13:29:06+5:30

आया होली का त्योहार.... असं म्हणत रंगांची जी काही उधळण देशभर केली जाते, त्यामुळे मन तर प्रसन्न होतंच, पण रंगाचं देखणं रुप बघून आपल्यालाही नवा उत्साह येतो... सगळं काही चैतन्यमयी वाटू लागतं....

प्रत्येक सण येताना आनंद, सुख, समाधान सोबत घेऊन येतोच... सण म्हणजे मुळातच सेलिब्रेशन... मग आता तर रंगांचं सेलिब्रेशन आहे, तर मुह तो मीठा करना ही पडेगा... शिवाय आपल्या भारतात त्या बाबतीतही अगदी समृद्धी आहे...त्यामुळे सुगरणींच्या हातून बनलेल्या गोडधोड पदार्थांची कमी आपल्याकडे नाहीच..

सणाच्या दिवशी प्रत्येक प्रातांत वेगवेगळे पदार्थ केले जातात... ते ही आपली आपली खासियत आणि स्वतंत्र ओळख सांभाळून. त्यामुळेच तर होळीच्या दिवशी बघा भारतातल्या विविध प्रांतात किती वेगवेगळे गोड पदार्थ केले जातात ते...

महाराष्ट्रात होळीच्या दिवशी मऊ, लुसलुशीत पुरणपोळ्या केल्या जातात... हरबऱ्याची डाळ शिजवून त्यात आवडीनुसार गुळ, साखर घालून पुरण केलं जातं.. आतमध्ये पुरण आणि वरतून गव्हाच्या पिठाचं आवरण... अशी मऊसूत, खमंग भाजलेली पुरणपोळी तुपासाेबत खाणं म्हणजे मराठी माणसांचा विकपॉईंट..

महाराष्ट्राचे शेजारी असणारे गुजराती बांधव होळीच्या दिवशी आवर्जून शेवयाची खीर करतात.. आपण मराठीत याला शेवयाची खीर म्हणत असलो, तरी त्यांच्याकडे हा पदार्थ 'मिठी सेव' म्हणून ओळखला जातो. तूपात खमंग परतून घेतलेल्या शेवया दूध, साखर टाकून शिजवल्या जातात आणि तयार होते मस्त चवदार मिठी सेव..

पंजाबमध्ये होळीच्या दिवशी घीहर हा पदार्थ केला जातो. जिलेबी किंवा इम्रती जशी असते, तशाच वळणाने जाणारा हा पदार्थ. पण जिलबी पातळी असते आणि घीवर करताना त्याचे एकावर एक असे थर दिले जातात. तळून झालेले घीवर पाकातून काढले जातात. त्यावर सुकामेवा टाकून सजावट करण्यात येते.

मावा कचोरी किंवा गुज्जीया हा राजस्थानचा होळी स्पेशल पदार्थ... वरवर बघितलं तर आपण जशा करंज्या करतो, तसाच दिसतो हा पदार्थ. फक्त गुज्जीया करताना त्यात खवा घातला जातो.. खवा, सुकामेवा, भरपूर तूप घालून तयार केलेले गुज्जीया होळीच्या दिवशी राजस्थानमध्ये हमखास तळलेच जातात. त्यालाच काही भागात मावा कचोरी असंही म्हणतात.

महाराष्टाचीच पुरणपोळी आंध्रामध्ये होलिगा, कर्नाटकात बोबाट्टू आणि तामिळनाडूमध्ये बोली या नावाने ओळखली जाते. हा पदार्थ करण्याची पद्धतही थोड्या फार फरकाने सारखीच आहे.