ओपन पोर्समुळे चेहरा खूपच रापलेला दिसतो? ५ सोपे उपाय, ओपन पोर्स जाऊन त्वचा दिसेल तरुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2024 12:50 PM2024-07-03T12:50:22+5:302024-07-03T12:57:57+5:30

साधारण पंचवीशी, तिशीच्या पुढे वयाचा काटा सरकला की अनेक जणींच्या गालावर, कपाळावर बारीक बारीक छिद्रं दिसू लागतात. त्यालाच आपण ओपन पोर्स किंवा मग त्वचेवरील रंध्रे म्हणतो. (home remedies for reducing open pores)

त्वचेच्या आतल्या भागात तयार होणारे नैसर्गिक तेल या रंध्रांमधून बाहेर येते आणि ते त्वचेला पोषण देतो. पण बऱ्याच जणींच्या बाबतीत असं होतं की ओपन पोर्सचा आकार खूप वाढू लागतो आणि त्यामुळे मग आपला चेहरा जाडाभरडा, रापलेला, वयस्कर दिसतो. त्वचेचा नाजूकपणा कमी होतो. (5 amazing home made face packs to close your open pores)

म्हणूनच ही रंध्रे किंवा ओपन पोर्स कमी करण्यासाठी हे काही घरगुती फेसपॅक लावून पाहा. यामुळे काही दिवसांतच पोर्सचा आकार बऱ्याच प्रमाणात कमी झालेला जाणवेल.

यातला सगळ्यात पहिला उपाय म्हणजे ॲलोव्हेरा जेल आणि काकडी यांचा फेसपॅक. यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा ॲलोव्हेरा जेल आणि २ चमचे काकडीचा रस घ्या. हे सगळं मिश्रण एकत्र करून त्याने चेहऱ्याला मसाज करा. त्यानंतर १५ ते २० मिनिटांनी चेहरा धुवून टाका.

दुसरा उपाय करण्यासाठी पपईचा गर २ चमचे घ्या. त्यात २ चमचे मध टाका. हे सगळं मिश्रण व्यवस्थित कालवून चेहऱ्याला लावा. त्यानंतर २० ते २५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. पपईतले एन्झाईम्स ओपन पोर्स कमी करण्यासाठी मदत करतात.

तिसरा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये ओटमील घ्या आणि दही टाकून ते कालवा. आता ही पेस्ट चेहऱ्याला लावा. पेस्ट अर्धवट सुकली की हलक्या हाताने चोळून ती काढून टाका. ओटमीलमुळे डेड स्किन निघून त्वचा स्वच्छ होईल तसेच दह्यामुळे रंध्रे कमी होऊन त्वचा टाईट होण्यास मदत होईल.

मध आणि लिंबाचा रस एकत्रित करून चेहऱ्याला लावल्यानेही त्वचेवरचे ओपन पोअर्स कमी होऊन त्वचा चमकण्यास मदत होते.

टोमॅटोमध्ये असणारे लायकोपीन आणि ॲस्ट्रिंजंट घटकही ओपन पोअर्स कमी करून त्वचा टाईट करण्यासाठी उपयुक्त आहेत. यासाठी टोमॅटो मिक्सरमधून बारीक करा. ही प्युरी चेहऱ्याला लावा आणि सुकत आली की चेहरा धुवून टाका.