खोबरेल तेल प्रत्येकासाठीच फायदेशीर नाही! तज्ज्ञ सांगतात केसांसाठी, आरोग्यासाठी सर्वोत्तम तेल कसं निवडावं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2024 01:46 PM2024-06-26T13:46:23+5:302024-06-26T13:51:32+5:30

आपल्याकडे बहुतांश घरांमध्ये केसांसाठी किंवा अंगाला मालिश करण्यासाठी सरसकट खोबरेल तेलाचीच निवड केली जाते.

पण हे तेल सगळ्यांसाठीच एकसारखं उपयुक्त ठरतं असं नाही. त्यामुळेच तर आपल्या पाहण्यात दोन प्रकारचे लोक येतात. पहिला प्रकारातले लोक खोबरेल तेल केसांना लावतात पण त्यांचे केस खूप पातळ असतात. केस गळण्याने ते लोक वैतागलेले असतात.

पण त्याउलट दुसऱ्या प्रकारात अशा व्यक्ती असतात ज्या केसांना खोबरेल तेलच लावतात. पण तरीही त्यांचे केस खूप दाट, लांबसडक असतात. असं होण्यामागचं कारण हेच आहे की कोणतंही तेल सरसकट सगळ्यांसाठीच सर्वोत्तम असेल असं नाही.

याविषयीचा एक व्हिडिओ merishrushti या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. यामध्ये असं सांगितलं आहे की मानवी शरीराच्या पित्त, वात या प्रकृतीनुसार तेलाची निवड करावी.

उदा. जे लोक पित्त प्रकृतीचे असतात त्यांचे शरीर थोडे उष्ण असते. म्हणजेच अशा लोकांनी थंड प्रकृतीच्या तेलाची निवड केली पाहिजे. खोबरेल तेल हे थंड प्रकृतीचे तेल आहे. त्यामुळे पित्त प्रकृतीच्या लोकांसाठी ते फायदेशीर ठरते.

वात प्रकृती असणाऱ्या लोकांचे शरीर थंड असते. त्यामुळे अशा लोकांसाठी उष्ण तेल फायदेशीर ठरते. त्यामुळे वात प्रकृती असणाऱ्या लोकांनी मोहरीचे किंवा तिळाचे तेल लावण्यास प्राधान्य द्यावे. त्यामुळे त्यांच्या शरीराला आणि केसांना अधिक फायदा होऊ शकतो.

जर तुम्ही कफ प्रकृतीचे असाल तर तुमच्यासाठी मोहरी, जोजोबा किंवा टी- ट्री ऑईल अधिक फायदेशीर ठरते.