व्हाईट शूज कसे स्वच्छ करावेत?... ९ सोप्या टीप्स... व्हाईट शूज होतील चमकदार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2023 05:17 PM2023-01-17T17:17:34+5:302023-01-17T17:49:11+5:30

How To Clean White Shoes At Home : व्हाईट शूज जेवढे आपल्या लूकवर कूल दिसतात तेवढेच ते स्वच्छ करणे खूप अवघड होऊन जाते.

आपण वेगवेगळ्या ड्रेसवर त्याला मॅच होतील असे फॅशनेबल चपला, बूट घालणे पसंत करतो. आपण कधी कपड्यांच्या रंगांना मॅच होणारे तर कधी कपडयांच्या पॅटर्नला मॅच होणारे शूज घालतो. रंगीबेरंगी चपलांसोबतच आपल्याकडे एक पांढऱ्या चपलांचा किंवा शूजचा जोड असतोच. आपण हे पांढऱ्या रंगांचे शूज किंवा चपला खूप काळजी घेऊन वापरतो. आपल्या पांढऱ्या शूजना किंवा चपलांना कोणत्याही प्रकारचा डाग लागणार नाही याची आपण खबरदारी घेतो. सध्याच्या काळात फॅशन म्हटलं की कपड्यांएवढेच महत्व आपल्या फूटवेअर्सला आहे. फूटवेअर्समध्ये तरुणाईची अधिक पसंती शूजला असते. व्हाईट शूज मग अगदी कन्व्हर्स असो किंवा स्पोर्ट्स प्रत्येक ड्रेससोबत सहज मॅच होतात. व्हाईट शूज जेवढे आपल्या लूकवर कूल दिसतात तेवढेच ते स्वच्छ करणे खूप अवघड होऊन जाते. असे शूज पांढरेशुभ्र असल्यामुळे लवकर खराब असतात किंवा छोटासा डागसुद्धा लवकर दिसून येतो. इतर रंगाचे शूज डागाळले तर त्याकडे इतके लक्ष जात नाही जेवढे व्हाईट शूज खराब झाल्यावर जाते. जोपर्यंत व्हाईट शूजवरचा डाग काढला जात नाही तोपर्यंत ते स्वच्छ दिसत नाहीत आणि पर्यायाने आपण वापरूही शकत नाही. काही सोप्या टीप्स फॉलो करुन आपण आपले पांढरे शूज अगदी सहज स्वच्छ करु शकतो(How To Clean White Shoes At Home).)

१/२ कप गरम पाण्यात १ टेबलस्पून बेकिंग सोडा, १/२ टेबलस्पून हायड्रोजन पॅरॉक्सइड मिसळून या मिश्रणाची एक जाडसर पेस्ट तयार करून घ्या. एका स्क्रबरवर ही पेस्ट घेऊन पांढऱ्या शूजवर स्क्रब करण्यास सुरुवात करा. जर आपले शूज जास्त मळले असतील किंवा खूप जास्त माती, चिखल चिकटला असेल तर ही पेस्ट जोरात स्क्रब करा. तुमचे शूज जितके मळले असतील त्यानुसार स्क्रब करण्यावर भर द्यावा.

पांढऱ्या रंगांच्या शूजवरून हट्टी डाग हटवण्यासाठी आपण बेकिंग सोड्याचा देखील वापर करू शकतो. एक कप पाण्यात २ टेबलस्पून बेकिंग सोडा घालून त्याची एक पातळ पेस्ट करून घ्या. ही पातळ पेस्ट त्या हट्टी डागांवर लावा. ही पेस्ट लावून थोडा वेळ सुकेपर्यंत असेच ठेवून द्या. सुकल्यानंतर एका स्वच्छ सुती कापडाने पुसून घ्या. अशाप्रकारे बेकिंग सोडा वापरून तुम्ही पांढरे शूज स्वच्छ करू शकता.

घरात जर एखादा न वापरात येणारा टूथब्रश असेल तर त्याने तुम्ही तुमचे शूज स्वच्छ करू शकता. टूथब्रशचे ब्रेसेल्स हे शूजच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत जाऊ शकतात. म्हणून टूथब्रशचा वापर करून तुम्ही पांढरे शूज साफ करू शकता.

जर तुमच्या पांढऱ्या रंगांच्या शूजचा रंग फिका पडला असेल तर टूथपेस्ट आणि डिटर्जंटचा वापर करून तुम्ही त्याची चमक परत आणू शकता. पांढऱ्या शूजवर जिथे डाग आहेत त्या ठिकाणी टूथपेस्ट लावून मग त्यावर डिटर्जंट घाला. त्यानंतर कपडे धुण्याचा ब्रश किंवा टूथब्रश वापरून त्या डागांवर हलकेच घासा. त्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून घ्या.

पांढरे शूज स्वच्छ करण्यासाठी आपण लिंबाच्या रसाचा देखील वापर करू शकतो. लिंबाच्या रसाने तुमचे केवळ डागच स्वच्छ होत नाही तर शूजमध्ये असणारा कुबट वास देखील निघून जातो. एक कप गरम पाण्यात एक लिंबाचा रस घालून हे मिश्रण डागांवर चोळा. यामुळे पांढरे शूज स्वच्छ होऊन त्यावरील जुने हट्टी डाग जाऊन शूजची चमक परत येऊन ते नव्यासारखे दिसतील.

व्हिनेगर आणि बेकिंग सोडा वापरून देखील आपण पांढरे शूज साफ करू शकतो. अर्धा कप व्हिनेगर घेऊन त्यात १ टेबलस्पून बेकिंग सोडा घाला. हे मिश्रण पांढऱ्या शूजवरील डागांवर लावल्याने हे हट्टी डाग लगेच निघून जातील.

नेल पॉलिश रिमूव्हर सध्या प्रत्येक घरात उपलब्ध असते. व्हाईट शूज चमकवण्यासाठी नेल पॉलिश रिमूव्हर हा एक चांगला पर्याय आहे. शूज धुतल्यानंतर आणि डाग काढून टाकल्यानंतर नेल पॉलिश रिमूव्हर लावावे. जर काही डाग उरले असतील तर ते सहजपणे लगेचच निघून जातील.

पांढरे शूज जर खूपच खराब आणि त्यातून खूप दुर्गंधी येत असेल तर तुम्ही ते वॉशिंग मशीनमध्ये देखील धुवू शकता. यासाठी हे पांढरे शूज एका मॅश बॅगमध्ये पॅक करून मग त्यांना सील करून वॉशिंग मशीन मध्ये धुण्यासाठी टाकू शकता. वॉशिंग मशीनमध्ये डिटर्जंट आणि पाण्याच्या मदतीने तुमचे पांढरे शूज स्वच्छ होतील.

व्हाईट शूज जेव्हा चमकत असतील तेव्हा अधिक आकर्षक दिसतात. ब्लीचमुळे शूजची चमक वाढते. पाण्यामध्ये थोडेसे ब्लीच मिसळून शूजवर लावावे. हे करताना एक काळजी घ्या की शूजच्या रबर असलेल्या भागावरच लावावे आणि तेवढेच वापरा जेवढे गरजेचे आहे.