इडली फुगत नाही- चिकट होते? ५ गोष्टी करून पाहा- मस्त फुगून कापसासारखी मऊ होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2024 12:22 PM2024-11-06T12:22:49+5:302024-11-06T12:31:15+5:30

हॉटेलसारखी मऊ- लुसलुशीत आणि फुगलेली इडली घरी होतच नाही, अशी अनेकींची तक्रार असते. काही जणींनी केलेली इडली अगदीच चिकट होते (tips and tricks for making idli). असं तुमच्याही बाबतीत होत असेल तर इडलीचं पीठ तयार करताना या गोष्टी एकदा ट्राय करून पाहा..(how to make idli batter for soft and spongy idli?)

तुम्ही केलेली इडली नेमकी कशी होणार हे इडलीचं पीठ तयार करण्यासाठी तुम्ही वापरलेल्या पदार्थांचं प्रमाण, त्या पीठाला आंबविण्यासाठी दिलेला वेळ यावर खूप जास्त अवलंबून असतं.(5 tips for making perfect idli)

इडली तयार करण्यासाठी नेहमी जुना तांदूळ वापरावा. नव्या तांदळाच्या इडल्या म्हणाव्या तशा फुलत नाहीत.

इडली करण्यासाठी तांदूळ आणि उडीद डाळ नेहमी ३: १ या प्रमाणात घ्यावे. शिवाय त्यामध्ये एखादा टेबलस्पून मेथी दाणे घालावे. डाळ आणि तांदूळ २ ते ३ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे आणि त्यानंतर साधारण ४ ते ६ तासांसाठी ते पाण्यात भिजत घालावे.

त्यानंतर डाळ- तांदूळ मिक्सरमधून वाटताना त्याची अगदी बारीक पेस्ट करावी. शिवाय त्यात अजिबातच जास्तीचे पाणी टाकू नये. इडलीचं पीठ जेवढं घट्ट असेल तेवढं चांगलं.

डाळ- तांदूळ मिक्सरमधून वाटून झाल्यानंतर ते ८ ते १२ तास आंबविण्यासाठी ठेवावे. जेव्हा पीठ फुगून जवळपास दुप्पट होईल, त्यावेळी इडल्या करण्यास घ्या. अशा पिठाच्या इडल्या अतिशय मऊ आणि हलक्या होतात.

इडल्या नेहमी मध्यम आचेवर कराव्या. त्यामुळे त्या व्यवस्थित शिजतात आणि छान मऊ होतात. तसेच इडली झाल्यानंतर त्या लगेच काढू नका. गॅस बंद केल्यानंतर ८ ते १० मिनिटे त्या इडली पात्रातून बाहेर काढून व्यवस्थित सेट होऊ द्या आणि नंतर काढा.