चष्मा लावल्याने नाकावर काळे डाग पडले? ८ उपाय-डाग गायब होतील काहीच दिवसांत... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2024 06:44 PM 2024-09-25T18:44:51+5:30 2024-09-25T18:52:17+5:30
How to remove marks or pigmentation on nose because of spectacles or glasses : चष्म्यामुळे अनेकजणांच्या नाक आणि कपाळावरील भागांवर काळे डाग पडतात, ते घालवण्यासाठी खास उपाय... चष्मा लावणे ही आता एक कॉमन गोष्ट झाली आहे. आजकाल लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच चष्मा असतो. एकदा का चष्मा लागला की तो कायम वापरावाच लागतोच. चष्मा सतत डोळ्यांवर लावल्यामुळे आपल्या नाकावर आणि डोळ्यांच्या खाली त्या चष्म्याचे हळुहळु काळे डाग पडू लागतात. या काळ्या डागांमुळे आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य हरवून जाते. चष्मा लावलेला नसताना हे डाग खूप स्पष्ट उठून दिसतात. आपले नाक, कपाळ आणि डोळ्यांखालील चष्म्याचे हे काळे डाग काढून टाकण्यासाठी आपण काही सोप्या आणि घरगुती उपायांचा वापर करु शकतो(How to remove marks or pigmentation on nose because of spectacles or glasses).
१. एलोवेरा जेल :- चष्म्यामुळे स्किनवर पडलेले काळे डाग कमी करण्यासाठी आपण एलोवेरा जेलचा वापर करु शकता. एलोवेरा जेलमध्ये लिंबाच्या रसाचे ३ ते ४ थेंब घालून या मिश्रणाने डागांवर मालिश करावी. काही आठवड्यातच हे डाग कमी होतात.
२. बटाट्याची पेस्ट :- बटाटा हा नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून ओळखला जातो. स्किनवरील चष्म्याचे काळे डाग घालवण्यासाठी आपण कच्चा बटाटा मिक्सरमध्ये वाटून त्याची पातळसर पेस्ट तयार करून त्या डागांवर लावू शकतो. यासोबतच कच्च्या बटाट्याच्या रसात ३ ते ४ थेंब मध घालून या मिश्रणाने डागांवर मसाज करून घ्यावा. यामुळे डाग कमी होण्यास मदत मिळते.
३. काकडी :- आपल्या स्किनवर पडलेले चष्म्याचे काळे हट्टी डाग घालवण्यासाठी काकडीचा वापर करता येऊ शकतो. यासाठी काकडीच्या गोलाकार चकत्या कापून घ्याव्यात. या गोलाकार चकत्या एका डिशमध्ये ठेवून त्या फ्रिजरमध्ये थोड्यावेळासाठी थंड होण्यासाठी ठेवून द्याव्यात. त्यानंतर थोड्या वेळाने या काकडीच्या चकत्या फ्रिजमधून काढून त्या थेट डागांवर ठेवाव्यात. त्याचबरोबर या चकत्या हलकेच डागांवर स्क्रब करुन घ्याव्यात. यामुळे काळे डाग कमी होतात.
४. लिंबाचा रस - पुदिना :- लिंबाचा रस हे काळे डाग घालवण्याचा एक रामबाण उपाय आहे. यासाठी लिंबाच्या रसात पुदिन्याच्या पानांची पेस्ट करून ती मिक्स करावी. हे दोन्ही जिन्नस एकत्रित करून तयार मिश्रण कापसाच्या बोळ्यावर लावून थेट डागांवर लावावे. १५ तें २० मिनिटे हे तसेच स्किनवर लावून ठेवावे त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.
५. बदामाचे तेल :- नेहमी चष्मा घातल्याने स्किनवर पडणारे काळे डाग दूर करण्यासाठी तुम्ही बदामाचे तेलही लावू शकता. यासाठी बदामाचे तेल घेऊन ते काळ्या डागांवर लावून ५ मिनिटे मसाज करावा. हा उपाय केल्याने अधिक फायदा होऊ शकतो.
६. गुलाब पाणी :- व्हिनेगरमध्ये गुलाब पाणी मिसळून हे तयार मिश्रण डागांवर लावा. हा उपाय केल्याने काहीच दिवसातच काळे डाग कमी होऊ लागतील आणि त्या भागातील आपली स्किनही उजळून निघेल.
७. अॅप्पल सायडर व्हिनेगर :- अॅप्पल सायडर व्हिनेगर पाण्यात मिसळून हे मिश्रण डागांवर लावल्याने काळे डाग दूर होण्यास मदत होते. यासाठी कापसाचा बोळा घेऊन व्हिनेगर आणि पाण्याच्या मिश्रणात भिजवा आणि चष्म्याच्या काळ्या डागांवर लावा. यामुळे काही दिवसात फरक दिसू लागेल.
८. संत्र्याची साल :- संत्र्याच्या सालींची पेस्ट तयार करा त्यात कच्च दूध घाला आता हे तयार मिश्रण डागांवर लावून घ्यावे. ५ ते ७मिनिटांनंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. काळे डाग फिकट होण्यास अधिक मदत होईल.