वजन कन्ट्रोल करायचं तर रात्री आहारात 8 गोष्टींचा करा समावेश, वाटेल फ्रेश- आणि फिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2022 05:46 PM2022-06-03T17:46:27+5:302022-06-03T18:00:31+5:30

वाढतं वजन कंट्रोल करण्यासाठी रात्रीच्या जेवणात हव्या 8 गोष्टी.. फॅट टू फिटचा प्रवास होईल वेगाने

वेगानं वाढणारं वजन कमी करण्यासाठी रात्री न जेवलेलंच बरं म्हणून काहीजण न जेवण्याचा पर्याय स्वीकारतात. पण वजन कमी करण्यासाठी या पर्यायाचा अवलंब करणं ही मोठी चूक आहे. आहारतज्ज्ञ म्हणतात रात्रीचं जेवण टाळल्यानं नाही तर रात्रीच्या जेवणात योग्य पदार्थांचा समावेश केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. म्हणूनच रात्रीच्या जेवणात कोणत्या गोष्टी असायला हव्यात हे समजून घेणं आवश्यक आहे.

वजन नियमित वाढतच असेल तर रात्रीच्या जेवणात ब्रोकोली खावी. वजन कमी करण्यासाठी ब्रोकोली शिजवून खाण्यापेक्षा कच्ची खायला हवी. यासाठी ब्रोकोली सॅलेड स्वरुपात खायला हवी.

वजन कमी करण्यासाठी रात्री जेवण करणं टाळण्यापेक्षा जेवण मर्यादित करणं योग्य. जेवण जास्त करण्याची सवय असल्यास रात्रीच्या जेवणात काकडीचा समावेश अवश्य करावा. काकडीत पाण्याचं प्रमाण भरपूर असतं. काकडी खाल्ल्यानं पोट भरल्याची जाणीव लवकर होते. शरीरात ओलावा निर्माण होतो. तसेच रात्रीच्या जेवणात काकडी खाल्ल्यानं शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते.

रात्रीचा आहार हलका फुलका आणि पोषक असायला हवा. शरीरास आवश्यक पोषणमुल्यं रात्रीच्या जेवणातून मिळणं गरजेची असतात. यासाठी रात्री जेवणात ग्रीन सॅलेड अवश्य खावं. सॅलेडमधून पोषणमूल्यं आणि ग्रीन सॅलेडमध्ये असलेल्या फायबरमुळे चरबी कमी होते.

दह्यात उष्मांक कमी असतात. तसेच वजन कमी करणारे सूक्ष्म पोषणमुल्यं दह्यामध्ये असतात. रात्रीच्या जेवणात नुसतं दही न खाता दह्याचा रायता खावा.

वजन कमी होण्यासाठी शरीरास प्रथिनांची गरज असते. पनीरमध्ये प्रथिनांचं प्रमाण चांगलं असतं त्यामुळे वजन कमी करण्यासाठी पनीर उपयोगी पडतं. तसेच पनीरमधील अमिनो ॲसिडमुळे रात्री चांगली झोप येते. वजन कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणात पनीरची भाजी खावी. अर्थात ती कमी मसालेदार असावी.

प्रथिनं आणि फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्यास वजन वेगानं कमी होण्यास मदत होते. ओट्समध्ये प्रथिनं आणि फायबरचं प्रमाण जास्त असतं. ओट्समुळे पोट लवकर भरतं. ओट्सचे विविध पदार्थ करता येतात. रात्रीच्या जेवणात ओट्सचे पदार्थ असल्यास पचन सुधारतं.

वजन कमी होण्यासाठी रात्रीच्या जेवणात पालेभाज्यांचा अवश्य समावेश करावा. पालेभाज्यांमुळे वजन कमी होण्यासोबतच शरीराला आवश्यक पोषक घटकही मिळतात.

हिरव्या मिरचीतील गुणधर्मांमुळे चयापचय क्रिया सुधारते. शरीरातील चरबी कमी होते. त्यामुळे रात्रीच्या जेवणातील पदार्थात हिरव्या मिरचीचा अवश्य समावेश करावा.