पावसाळ्यात बटाट्याला खूपच लवकर कोंब येतात, असे बटाटे खावेत का? वाचा तज्ज्ञांनी दिलेला सल्ला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2024 09:06 AM2024-07-09T09:06:08+5:302024-07-09T09:10:01+5:30

बटाटे कधीही उपयोगी येतात. त्यामुळे आपण ते जरा जास्तीचे घेऊन ठेवतो. एरवी ते चांगले टिकतात. पण पावसाळ्याच्या दिवसांत मात्र बटाट्यांना खूपच लवकर कोंब फुटतात.

असे कोंब फुटलेले बटाटे पाहिले की आपण सरळ त्यांचा कोंब काढून टाकतो आणि बटाटे स्वयंपाकात वापरतो. पण आपण हे जे करतो ते आरोग्यासाठी चांगलं की वाईट बघा याविषयीचा अभ्यास काय सांगतो..

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार पोटॅटो केमिस्ट्री ॲण्ड टेक्नोलॉजी यांच्यातर्फे बटाट्याचा अभ्यास करणारं जे जर्नल प्रकाशित करण्यात आलं आहे त्यानुसार बटाट्यामध्ये सोलानाईन आणि कॅकोनाईन असे दोन ग्लायकोल्काईड कंपाउंड असतात. ते जेव्हा आपण थोड्या प्रमाणात खातो, तेव्हा ते कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात.

पण कोंब फुटलेल्या बटाट्यांमध्ये हे दोन्ही घटक मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे त्याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो.

आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. वरलक्ष्मी यनमंद्रा यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टनुसार अशा पद्धतीचे कोंब आलेले बटाटे खाणं आराेग्यासाठी धोकादायक ठरणारं आहे. यामुळे अन्नावरची वासना उडणे, मळमळ होणे, पोट दुखणे, डोकेदुखी, डायरिया, मळमळ असा त्रास होऊ शकतो.

असे बटाटे शक्यतो न खाल्लेलेच बरे असं डॉ. वरलक्ष्मी सांगतात. पण तुम्हाला ते टाकून द्यायचे नसतीत तर कोंबाचा भाग तर काढाच, पण त्याच्या आजुबाजुचा इतर भागही काढून टाका. बटाट्याची सालं काढून टाका आणि नंतर ते खा, असं त्यांनी सांगितलं.