कंगनाचा नॅशनल अवॉर्ड लूक, कधी हॉट मॉडर्न कधी टिपिकल ट्रॅडिशनल! अजब लूक की गजब कहाणी.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2021 06:03 PM 2021-10-25T18:03:27+5:30 2021-10-25T18:10:36+5:30
विविध विषयांवर भाष्य करणारी कंगना तिच्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असते. याबरोबरच उत्तम अभिनय ही तिची जमेची बाजू असली तरी कपड्यांच्या स्टाइलमुळेही ती चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. कंगना रनौत हिला यंदाचा उत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाला. कंगनाला चौथ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे सोहळ्याच्या लूकमधील फोटो पोस्ट केले. सुरुवातीला मॉडर्न असलेली कंगना आता राजकीय भूमिका म्हणून एकदम इंडियन लूकमध्ये पाहायला मिळाली.
मनिकर्णिका - द क्विन ऑफ झाशी (२०१९) आणि पंगा (२०२०) या दोन चित्रपटातील भूमिकेसाठी कंगनाला उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला. ६७ व राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार घेण्यासाठी कंगना चक्क साडी आणि पारंपरिक दागिने घालून हजर असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी तिने सोनेरी रंगाची साडी नेसली होती. तर त्यावरील गोल्डन सेट, गजरा आणि टिकली हा लूक सर्वांचेच लक्ष वेधून घेणारा ठरला. जशा तिच्या राजकीय भूमिका बदलल्या तसे तिच्या पेहरावातही बदल झाल्याचे पाहायला मिळाले.
याआधी सर्वात पहिल्यांदा कंगनाला २००८ मध्ये ५६ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात फॅशन या चित्रपटातील भूमिकेसाठी गौरवण्यात आले होते. तेव्हा ती अतिशय सामान्य अशा पंजाबी ड्रेसमध्ये हा पुरस्कार घेण्यासाठी गेल्याचे दिसून आले होते.
यानंतर मात्र कंगना जशी प्रकाशझोतात यायला लागली तसा तिचा ड्रेसिंग सेन्स बदलत गेल्याचे पाहायला मिळाले. २०१५ च्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात तिला क्विन चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळाला. यावेळी ती लो नेक गाऊनमध्ये पाहायला मिळाली.
६३ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात ती ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसली होती. यावेळी तिने घातलेल्या सिल्व्हर रंगाच्या गाऊनवर ग्लिटर होते. तिचा हेयरकटही अतिशय लहान असल्याचे पाहायला मिळाले.
तिसऱ्या राष्ट्रीय पुरस्कारानंतर तिने फॅमिलीसोबत काढलेला एक फोटो समोर आला होता. यात तिचे आई-वडिल, भाऊ आणि बहीण दिसत होते. क्विन चित्रपटानंतर कंगनाला खऱ्या अर्थाने बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली.
त्यानंतर २०१६ मध्ये कंगनाला पुन्हा तनु वेड्स मनु चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळाला होता. यावेळीही तिने पांढऱ्या रंगाचा एक फॅशनेबल गाऊन घातल्याचे पाहायला मिळाले होते.
तत्कालिन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते तिला हा ६४ वा पुरस्कार मिळाल्याचे पाहायला मिळाले होते. कंगनाने आतापर्यंत तिच्या अभिनयाच्या जोरावर अनेक पुरस्कार मिळवले आहेत. त्यातील हे राष्ट्रीय पुरस्कार तिच्या कामाची विशेष दखल घेणारे ठरले आहेत.