केरळच्या लेस्बियन कपलने केलेले अनोखे फोटोशूट व्हायरल; अशीही एक लव्हस्टोरी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2022 04:42 PM2022-11-28T16:42:15+5:302022-11-28T17:07:16+5:30

Kerala Lesbian Couple Love story Photoshoot Adila Nasrin Fatima Nura : दोघींनाही त्यांच्या घरातून आणि एकूणच सर्वच स्तरातून बराच विरोध सहन करावा लागला.

केरळमधील आदिला नसरीन आणि फातिमा नूरा या दोघींनी नुकतंच समुद्रकिनाऱ्यावर फोटोशूट केलं आणि त्यामुळे त्या दोघी पुन्हा चर्चेत आल्या (Kerala Lesbian Couple Lovestory Photoshoot Adila Nasrin Fatima Nura).

काही वर्षांपासून सोबत असलेल्या आणि आयुष्यभर सोबत राहण्याची स्वप्न पाहणाऱ्या या दोघींनाही त्यांच्या घरातून आणि एकूणच सर्वच स्तरातून बराच विरोध सहन करावा लागला.

पालकांनी त्यांना वेगळं करण्याचा खूप प्रयत्न केला, त्यानंतर त्या न्यायालयात गेल्या आणि न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर आज त्यांना एकत्र राहायला परवानगी असल्याने त्या सोबत राहत आहेत.

आदिला २२ वर्षांची असून फातिमा २३ वर्षांची आहे. या दोघी इन्स्टाग्रामवर बऱ्याच अॅक्टीव्ह असून आपल्यासारख्या अडचणींचा सामना करणाऱ्यांना त्या मार्गदर्शन करत असतात.

इतके दिवस त्या एकमेकींसोबतचे फोटो सोशल मीडियावर उघडपणे टाकत नसत मात्र आता त्या दोघी उघडपणे आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करतात. आता आपण एका विशिष्ट टप्प्याच्या पुढे आलो असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

या दोघींनी एकमेकींना अंगठ्या घालतानाचे आणि केक कापतानाचे फोटो शेअर केले असून अखेर त्यांच्या नात्याला खास अशी ओळख मिळणार असल्याचे नक्की झाले आहे.

भारतीय सर्वोच्च न्यायालयाने २०१८ मध्ये समलिंगी लैंगिक संबंधांना गुन्हेगारीच्या कक्षेतून बाहेर काढले. मात्र त्यांच्यातील विवाहाला आजही मान्यता नसल्याने अनेक जणांचा याविषयी झगडा चालू असल्याचे दिसते.