कोकम तेल म्हणजे नैसर्गिक मॉइश्चरायझर! दुखणाऱ्या डोक्यापासून ठणकणाऱ्या पाऊलांपर्यंत घरगुती पारंपरिक उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2025 19:31 IST2025-04-03T19:20:14+5:302025-04-03T19:31:53+5:30

Kokum oil is a natural moisturizer! Traditional home remedies : कोकम तेल वापरणे अत्यंत फायद्याचे असते. त्वचेसाठी तर वरदानच आहे.

आपण विविध तेल वापरतो. जसे की खोबरेल तेल, तीळाचे तेल, सुर्यफुलाचे तेल इतरही अनेक प्रकारचे तेल आपण वापरतो. शरीरासाठी आरोग्यासाठी अशा तेलांचा भरपूर फायदा होतो. केसांना लावायला किंवा मालीश करायला तेलाचा वापर आपण करतो.

एक असे तेल आहे जे फार काही वापरले जात नाही. मात्र फार उपयुक्त असते. शरीरासाठी, त्वचेसाठी इतरही अनेक गोष्टींसाठी उपयुक्त ठरणारे तेल म्हणजे कोकमाचे. कोकमाच्या बियांपासून हे तेल तयार केले जाते.

कोकमाच्या बिया सुकवून त्या कुटल्या जातात, नंतर त्यांची भुकटी तयार केली जाते. पाण्यामध्ये ती उकळली जाते. त्यावर येणारा तवंग साठवला जातो. आणि अजून थोड्या प्रक्रिया केल्यानंतर हे कोकम तेल आपल्याला मिळते.

पूर्वीच्या काळी कोकम तेल भरपूर वापरले जायचे. भाकरीला लाऊन खाण्यासाठीही काही जण या तेलाचा वापर करतात. हे तेल द्रव्य स्वरुपाचे नसते ते घट्ट असते. ते वापरताना उगाळून किंवा वितळवून वापरले जाते.

पायाला भेगा पडतात किंवा हाताच्या तळव्याला भेगा पडतात, अशा लोकांसाठी हे कोकम तेल वरदानच आहे. रोज रात्री सातत्याने झोपण्यापूर्वी कोकम तेल भेगांवर लावा. काही दिवसातच तळवे स्वच्छ आणि मऊ होऊन जातात.

अनेक ब्यूटी प्रॉडक्ट्समध्ये हे तेल वापरेल जाते. कोकम तेल त्वचेसाठी फार उपयुक्त ठरते. त्वचेचे सगळे त्रास दूर करण्याची क्षमता या तेलामध्ये आहे. हाताला पायाला चेहर्‍याला कोकम तेल छान चोळून लावा. मग बघा त्वचा कशी उजळते.

कोकम तेल हे एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. कोरडी त्वचाही छान सुंदर होते. तसेच ओठांचे त्रासही दूर होतात. ओठ फुटणे तसेच सुकणे इतरही समस्या दूर होतात.

शरीरावरील पुरळ कमी होते. शरीराला रोज कोकम तेल चोळा. ते शरीरामध्ये जिरून जाते. शरीरावरील डागही निघून जातात. तसेच त्वचेची जळजळ होत असेल तर ते ही बंद होते. त्वचा छान चमकायला लागते.

केसांच्या आरोग्यासाठीही कोकम तेल फारच उपयुक्त आहे. आठवड्यातून एकदा जरी या तेलाने मसाज केला तरी, कमालीचे फायदे मिळतील. केस छान मऊ होतील तसेच चमकदारही होतील. पांढर्‍या केसांचे प्रमाण कमी होईल.