दिवाळीसाठी साडी खरेदी करायची आहे? पाहा साड्यांचे एक से एक लेटेस्ट प्रकार ...बघा, तुम्हाला काय आवडतंय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2022 04:31 PM2022-10-07T16:31:40+5:302022-10-07T17:37:34+5:30

Latest Saree Patterns for Diwali Shopping : नेहमीपेक्षा वेगळं काही शोधत असाल तर हटके पर्याय...

दिवाळी आली की महिलांसाठी सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे खरेदी. त्यातही साडी खरेदी करण्याचा आनंद काही वेगळाच. तुम्हीही यंदा दिवाळीला कोणत्या प्रकारची साडी घ्यायची असा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सध्या ट्रेंडमध्ये असलेले साडीचे एक से एक प्रकार नक्की लक्षात ठेवा (Latest Saree Paterns for Diwali Shopping).

१.प्युअर सिल्कमध्ये थोडी मोठी बॉर्डर असलेल्या या प्रकारच्या साड्या सध्या फॅशन इन आहेत. गडद रंग, लहान आकाराची बुट्टी आणि गोल्डन रंगाच्या काठामध्ये केलेले सुंदर नक्षीकाम ही या साडीची खासियत आहे.

२. टिळक पैठणी नावाने ओळखली जाणारी ही साडी सेमी सिल्क प्रकारात येते. यावरचे बुट्टे नेहमीसारखे गोल किंवा कोयऱ्यांचे नसून चौकोनी शंकरपाळ्याच्या आकाराचे आहेत. त्यामुळे ही साडी उठून दिसते. पैठणीची पारंपरिक बॉर्डर असल्याने ट्रॅडीशनल पण थोडा ट्रेंडी लूक हवा असेल तर हा उत्तम पर्याय आहे.

३. पेशवाई म्हणून ओळखला जाणारा हा प्रकार मदुराई सिल्क म्हणून प्रसिद्ध आहे. काठावर आणि काठाच्या बाजुने लहान आकाराचे गोलाकार मोर असून साडीवरही नाजूक अशी मोरांचीच बुट्टी दिली आहे. स्थूल असणाऱ्या महिलांना बारीक दिसायचे असेल तर अशाप्रकारची अंगाला चोपून बसणारी साडी नक्की घेऊ शकता.

४. नेहमीच्या काठापदराच्या साड्या नको असतील तर थोडी वेगळ्या पॅटर्नची पण रीच लूक असलेली डीझायनर कलमकारी साडीही नक्की घेऊ शकता. ही साडी आपण एखाद्या पार्टीला नक्की घालून जाऊ शकतो. सॉफ्ट कॉटन सिल्कमध्ये येणारी ही साडी तुमचा लूक अतिशय सुंदररित्या खुलवू शकेल.

५. पारंपरिक प्रकारांमध्ये मोडणारा इरकल हा प्रकार तुम्हाला थोडा नव्या फॉर्ममध्ये ट्राय करायचा असेल तर हा प्रकार अगदी छान आहे. प्यअर सिल्कमध्ये येणारी ही साडी वजनानेही हलकी असून ती अतिशय ग्रेसफूल दिसते. यामध्ये थोडी गडद क़ॉम्बिनेशन्स घेतल्यास तुम्ही सगळ्यांमध्ये उठून दिसता.

६. चंदेरी सिल्क प्रकारात मोडणारा हा प्रकार थोडा वेगळा आहे. पदर आणि साडीवर दोन रंगातील वेगळ्या प्रकारचा बुट्टा आणि नाजूक डिझाईनचे काठ ही या साडीची खासियत आहे. सणावाराला आणि एखाद्या कार्यक्रमालाही खुलून येणारी हा प्रकार ट्राय करायला हरकत नाही.

७. तुम्हाला काठपदर किंवा झगमग साड्या आवडत नसतील तर टिश्यू खादी सिल्क प्रकारात मोडणारी ही साडी तुम्ही घेऊ शकता. प्रोफेशनल मिटींग्ज किंवा एखाद्या लहानशा फंक्शनलाही ही साडी अतिशय सुंदर दिसते. यावर थोडे फॅशनेबल ब्लाऊज शिवले आणि हेवी ज्वेलरी घातली की यामध्ये तुम्ही ग्रेसफूल दिसाल.

८. पैठणीमध्ये अनेक प्रकार सध्या पाहायला मिळतात. त्यामध्ये नुकतीच आलेली चंद्रकला महाराणी पैठणी ही साडी आपल्याला खास लूक देईल. टिपिकल पैठणी काठ आणि अतिशय नाजूक अशी बुट्टी ही या साडीची खासियत आहे. प्युअर सिल्कमध्ये मोडणाऱ्या या साडीचा फिल तुम्हाला हातात घेतल्यावर येऊ शकतो.