Music Therapy: आळस- मरगळ-उदासी झटकून टाकायची आहे? 'ही' गाणी ऐका- ठरतील मूड चेंजर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2025 15:08 IST2025-01-17T13:23:09+5:302025-01-17T15:08:20+5:30

Music Therapy: कधी कधी मनाला एवढी मरगळ येते की कारण नसतानाही उगीचच उदास झाल्यासारखे वाटते. काहीच करू नये, कोणाशी बोलू नये, कुठेतरी निघून जावे असे विचार मनात घोळत राहतात. मनाबरोबर शरीरही रेंगाळते आणि अंगभर आळस पसरतो. कुठे काही प्रेम प्रकरण नसतानाही 'ब्रेक अप' झाल्यासारखी मनाची अवस्था होते. कधीतरी असे वाटणे अगदीच नॉर्मल आहे. सतत कोणीही लाटेवर स्वार होऊन वावरू शकत नाही. जसा उनाड दिवस असतो तसा उदास दिवस असूच शकतो. मात्र याच स्थितीत जास्त काळ राहणे मन:स्वास्थ्यासाठी चांगले नाही. यावर सोपी थेरेपी म्हणजे म्युझिक थेरेपी!

संगीत ही संजीवनी आहे असे म्हटले जाते. अशातच आपल्याकडे तर गाण्यांचा भला मोठा खजिना आहे. जन्मापासून मरणापर्यंत हर तऱ्हेच्या रचना आहेत, त्याही साग्रसंगीत! प्रत्येक मूडप्रमाणे, औचित्याप्रमाणे गाणी तयार आहेत आणि आता तर एका क्लिकवर ती उपलब्ध आहेत. मात्र कोणत्या वेळी कोणते गाणे ऐकावे याची जाण असावी. अन्यथा मूड ऑफ असताना 'लंबी जुदाई' वगैरे ऐकाल तर आणखी रडू कोसळेल, तेही अकारण! त्यामुळे मरगळ, आळस, नैराश्य झटकून उत्साह संचारेल अशी कोणती गाणी आहेत ते पाहू!

याठिकाणी तुम्हाला गाण्यांची यादी देणार नाहीये. कारण, गाण्यांची आवड प्रत्येकाची वेगळी असते. मात्र कोणत्या वेळी कोणती गाणी ऐकायची हे इथे सांगणार आहे. त्यानुसार तुम्हाला तुमची प्ले लिस्ट तयार करून ठेवायची आहे. मूड कधी, कसा आणि कशामुळे जाईल हे विशेषतः बायकांच्या बाबतीत अजिबात सांगता येत नाही. त्यामुळे आपल्या मनाला आपणच उभारी देण्यासाठी पुढीलप्रमाणे गाण्यांची यादी तयार करून ठेवा, नक्की कामी येईल.

आपली सकाळ कशी सुरु होते, यावर पूर्ण दिवस अवलंबून असतो. तो आनंददायी जावा म्हणून दिवसाची सुरुवात भक्तिगीताने करा. तुमच्या आवडीची भक्तिगीतं सकाळी ऐकता येतील. भक्तीगीतच का? तर ही गाणी आल्हाददायी असतात. त्यासाठी वापरलेले राग, स्वर, वाद्य यात कमालीची सकारात्मकता असते. असेही एकही भक्ती गीत नाही, जे ऐकून उदास वाटेल. एक वेळ वैराग्य येईल, पण नैराश्य नाही. मन सकारात्मक ऊर्जेने भरून जाईल!

असे म्हणतात, की आपल्या कॉलेजचा काळ हा उमलत्या वयातला असतो. त्या काळात एखाद्या व्यक्तीबद्दल वाटणारे आकर्षण, प्रेमाच्या भावना, शब्दांचा उमगलेला अर्थ आणि गाणी गुणगुणण्याचा छंद, यामुळे त्या काळात ऐकलेली गाणी मनाच्या अतिशय जवळची असतात आणि आयुष्यभर ती आपल्या कायम स्मरणात राहतात. त्या गाण्यांबरोबर आठवणीही ताज्या होतात आणि कितीही मूड ऑफ असला तरी ही गाणी मूड चेंजर ठरतात.

चक दे इंडिया, दंगल, भाग मिल्खा भाग, मिशन मंगल यांसारख्या चित्रपटातली ऊर्जा देणारी गाणी एका लिस्ट मध्ये सेव्ह करून ठेवता येतील. या गाण्यांमध्ये असलेले स्पोर्टींग स्पिरिट तुम्हाला कोणत्याही परिस्थितीतिशी लढण्याचे बळ देईल. अगदी आळस आला तरी तो निघून जाईल.

उदास, कंटाळा, आळस, नैराश्य यापैकी काहीही वाटत असेल आणि समोर कामाचा डोंगर दिसत असेल तर सरळ देशभक्तीची गाणी ऐका, अंबाबाईचा गोंधळ ऐका. कारण त्यात वापरलेली रणवाद्य, झुंझार शब्द मनाला उभारी देतील. आळस फार काळ मनावर राज्य गाजवू शकणार नाही.

नाच-गाणं सगळ्यांना येत नसले तरी व्यक्ती जेव्हा एकांतात असते, तेव्हा ती गुणगुणते, आनंदाच्या क्षणी नाचते, व्यक्त होते. जेव्हा आळस येतो, तेव्हा मनावर साचलेली मरगळ दूर करण्यास ही गाणी नक्कीच मदत करतील. गाण्यांमधले शब्द निरर्थक असले तरी त्याचे संगीत तुम्हाला डोलायला लावेल आणि मनाला उभारी देईल.

इंटरनेटवर संगीताचे अनेक प्रकार आहेत. त्यात मेडिटेशनल म्युझिकसुद्धा आहे. मन शांत ठेवण्यासाठी रोज दहा मिनिटे जरी हे संगीत ऐकले तरी लाभ होईल. मात्र आधीच आळस असताना मेडिटेशनल म्युझिक ऐकणे म्हणजे झोपेला आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे योग्य वेळी योग्य संगीत ऐकण्यास प्राधान्य द्या, आनंद घ्या आणि मस्त राहा.