तयारी नवरात्रीची: पितळेची भांडी, दिवे चकचकीत करण्यासाठी २ उपाय; भांडी दिसतील स्वच्छ-सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2022 06:26 PM2022-09-24T18:26:02+5:302022-09-24T18:38:38+5:30

१. नवरात्रीला देवाच्या मुर्ती आणि नऊ दिवस जो दिवा लावणार तो दिवा, घासून पुसून लख्ख केला जातो.

२. देवाच्या मुर्तींवर असलेल्या बारीक नक्षींमध्ये घाण जमा होते, अडकते. तसंच दिव्यांचंही असतं. त्यामुळे मग देवाच्या मुर्ती किंवा नक्षीदार दिवे स्वच्छ करण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागते.

३. या गोष्टी स्वच्छ करण्यासाठी बाजारात काही लिक्विड मिळतात. त्याने पितळी भांडी लवकर स्वच्छ होतात, पण हळूहळू त्यावरची नक्षी जाऊ लागते. त्यामुळे असे केमिकल्स असणारे लिक्विड वापरण्यापेक्षा काही घरगुती उपाय करून बघणे कधीही चांगले.

४. त्यासाठीच हे काही सोपे उपाय करून बघा. हे उपाय करण्यासाठी तुम्हाला खूप काही मेहनत घेण्याची गरज नाही. अगदी कमी कष्टांत दिवे आणि देवाच्या मुर्ती होतील स्वच्छ आणि चकाचक.

५. सगळ्यात आधी दिवे किंवा मुर्ती गरम पाण्यात अर्धा तास भिजत ठेवा. त्यानंतर भांडी- मुर्ती कोरड्या कपड्याने पुसून घ्या. आता दही आणि मीठ सम प्रमाणात घेऊन एकत्र करा आणि ते मुर्तींवर, दिव्यावर चोळा. वायरची घासणी वापरून मुर्ती, दिवे स्वच्छ करा. घासणे झाल्यानंतर पुन्हा एकदा काेमट पाणी घेऊन भांडी स्वच्छ करा.

६. दुसरा उपाय म्हणजे गरम पाण्यात अर्धा तास मुर्ती, दिवे भिजत ठेवल्यानंतर लिंबू आणि मीठ एकत्र करा आणि लिंबाच्या सालीने दिवे, भांडी घासा.

७. पितळाची पुजेची भांडी १० ते १५ मिनिटे कोमट पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर त्यावर चिंचेचा कोळ आणि मीठ हे मिश्रण एकत्र करून लावा. एखादा मिनिट हे मिश्रण मुर्तींवर तसेच राहू द्या. त्यानंतर प्रत्येक मुर्ती चोळून चोळून स्वच्छ करा.

८. वरील पद्धतीने मुर्ती- दिवे स्वच्छ केल्यानंतर ते ओलसर असतानाच त्यावर हळद चोळून लावा. हा लेप त्यावर ५ ते १० मिनिटे राहू द्या. त्यानंतर धुवून टाका.हळदीच्या लेपामुळे पितळी वस्तूंवर, मुर्तींवर अधिक पिवळसर झळाळी येईल.