तुपासोबत मुळीच खाऊ नका ३ पदार्थ! तूप खाऊनही बिघडतेय तब्येत, तुम्हीही करताय तीच चूक..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2025 17:22 IST2025-03-19T15:28:46+5:302025-03-20T17:22:29+5:30

तूप पौष्टिक आहेच यात काही वाद नाही. पण तरीही असे काही पदार्थ असतात जे एकमेकांसोबत खाणं आपल्या आरोग्यासाठी अजिबातच चांगलं नसतं. त्यालाच आयुर्वेदामध्ये विरुद्ध आहार असंही म्हटलं जातं.
तसंच काहीसं तुपाचं देखील आहे. तुपासोबत काही पदार्थ खाणं आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही, अशी डॉ. कपिल त्यागी यांनी दिलेली माहिती नवभारत टाईम्सने प्रकाशित केली आहे. त्यामुळे त्यांच्यामते तुपासोबत कोणते पदार्थ खाणं योग्य नाही ते पाहूया..
डाॅक्टरांनी सांगितलेला पहिला पदार्थ आहे दही. तूप आणि दही हे दोन्ही दुग्धजन्य पदार्थ असले तरी त्यांची प्रकृती वेगळी आहे. तूप दह्यापेक्षा पचायला थोडं सोपं असतं. दही पचायला वेळ लागतो. शिवाय तूप थंड असतं तर दही गरम असतं. त्यामुळे भिन्न प्रकृती असणारे हे दोन्ही पदार्थ एकत्र खाणं टाळायला हवं. कारण यामुळे काही लोकांना गॅसेस होणं, पोट दुखणं, ॲसिडीटी असे त्रास होऊ शकतात.
मुळा आणि तूप एकत्र खाणंही टाळायला हवं. त्यामुळे जेव्हा मुळ्याचं रायतं कराल तेव्हा त्याला तुपाची फोडणी घालण्यापेक्षा तेलाची फोडणी घाला. मुळा गरम प्रकृतीचा असतो तर तूप हे त्यापेक्षा बरेच सौम्य असते. त्यामुळे हे दोन पदार्थ एकत्र खाल्ल्याने अनेकांना पचनाचा त्रास तर होतोच, पण अंगावर सूजही येऊ शकते.
आयुर्वेदानुसार तूप आणि मध समप्रमाणात एकत्र करून खाणं आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक मानलं गेलं आहे. हे दोन्ही पदार्थ एकत्र करून खाल्ल्याने अपचनाचा त्रास होऊ शकतो.