आईबाबा आणि मुलांमधलं प्रेम वाढवणाऱ्या ५ गोष्टी, शिस्तच नाही तर चांगलं वळणही लागेल हसतखेळत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2022 09:55 AM2022-12-13T09:55:05+5:302022-12-13T10:00:01+5:30

Positive Parenting Techniques for Upbringing of Your Child : मुलांच्या मनावर लहानसहान गोष्टींचा परीणाम होत असल्याने पालक म्हणून आपण खूप जागरुक असणे गरजेचे असते.

पॅरेंटींग म्हणजेच पालकत्व हा अतिशय महत्त्वाचा विषय असून आपल्याकडे त्याकडे फारसे गांभिर्याने पाहिले जात नाही. पण लहानपणापासून पालक म्हणून आपण त्यांच्यावर जे संस्कार करतो, त्यांच्याशी जसं वागतो-बोलतो त्याचा त्यांच्या बालमनावर परीणाम तर होतोच पण हा परीणाम दिर्घकाळ तसाच राहतो हे पालकांनी लक्षात घ्यायला हवे (Positive Parenting Techniques for Upbringing of Your Child).

आपलं मुलांसोबतचं प्रेम टिकून राहावं आणि मुलं वाढत असताना आपणही त्यांच्यासोबत वाढावं, यासाठी पालक म्हणून आपण काही गोष्टी आवर्जून करायला हव्यात. यामुळे मुलांना चांगल्या सवयी लागतील आणि आपलं नातंही छान राहील.

मुलांना चांगली वागणूक देणे त्यांची निकोप वाढ होण्यासाठी अतिशय गरजेचे असते. त्यामुळे मुले आपल्याशी कनेक्टेड राहण्यास, त्यांना सुरक्षित वाटण्यास आणि एखाद्या गोष्टीसाठी ती सक्षम होण्यास उपयोग होतो. नाहीतर मुलं मनाने आपल्यापासून दूर जायला वेळ लागत नाही.

मुलांना एखाद्या गोष्टीत बंधने घालताना पालक म्हणून आपणही ती बंधने पाळतो का याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. नुसत्या कडक सूचनांपेक्षा नियम ठरवणे आणि ते पाळणे मुलांसाठी सकारात्मक असू शकते.

मुलांनी काही चुका केल्या तर त्याची शिक्षा देण्यापेक्षा आपल्या चुकांमधून आपण कसे शिकायचे हे मुलांना सांगा, जेणेकरून ते चुका करायला घाबरणार नाहीत. त्यामुळे चुकीतूनच आपण शिकतो हा संस्कार त्यांच्या मनावर पक्का होईल.

मुलांची चांगली वाढ होण्यासाठी त्यांच्याशी पालक म्हणून आपला उत्तम संवाद असणे अतिशय आवश्यक असते. संवाद हा पालक आणि मुलांच्या नात्यातील विश्वास, बाँड वाढवण्याचा एक चांगला मार्ग असल्याने आपल्या मुलांशी वेगवेगळ्या पद्धतीने जास्तीत जास्त संवाद साधा.