वजन कमी करताना हमखास होणाऱ्या ३ मोठ्या चुका, वजन कमी करताय की तब्येत बिघडवताय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2022 08:04 AM2022-12-01T08:04:08+5:302022-12-01T15:03:08+5:30

१. वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणारे अनेक जण असतात. त्यापैकी काही जण वाढत्या वजनाबाबत एवढे जास्त पॅनिक झालेले असतात की त्या नादातच त्यांच्याकडून काही चुका होऊन जातात. त्यामुळे मग वजन एकतर कमीच होत नाही किंवा कमी झालं तरी ते खूप काळ टिकत नाही. जेवढ्या लवकर वजन कमी केलं, तेवढ्या वेगाने ते पुन्हा वाढतं.

२. तुमचंही असंच होत असेल तर वजन कमी करताना तुमच्याकडूनही कळत नकळत या ३ चुका होत आहेत, असं समजून घ्या. सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी नुकतीच एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली असून त्यामध्ये त्यांनी वजन कमी करताना बहुतेक सगळ्यांकडूनच ज्या चुका होतात, त्या नेमक्या कोणत्या याबाबतची माहिती दिली आहे.

३. वजन कमी करताना होणारी सगळ्यात पहिली चूक म्हणजे व्यायाम किंवा डाएट यासाठी नेहमी पुढच्या आठवड्यात, पुढच्या महिन्यात, पुढच्या वर्षी सुरू करू असं अनेकांचं प्लॅनिंग असतं. ते आधी थांबवा आणि अगदी आज- आतापासून योग्य व्यायाम आणि आहार घ्यायला सुरुवात करा.

४. वजन कमी करायचं म्हणजे अनेक जण फक्त आकड्यांचा विचार करतात. अमूक- अमूक दिवसांत ५ किलो- १० किलो कमी करायचं, एवढं त्यांचं ध्येय असतं. पण त्यापायी अनेक जणांची झोप कमी होते, भूक मंदावते, अशक्तपणा येतो आणि तब्येतीच्या अनेक तक्रारी सुरू होतात. त्यामुळे वेटलॉस करताना आरोग्य बिघडणार नाही, याची काळजी घ्या.

५. वजन कमी करण्याची प्रक्रिया खूप क्लिष्ट करू नका. सहज- सोपं आणि सगळ्यात मुख्य म्हणजे ज्याचा त्रास होणार नाही, अशा पद्धतीने वजन कमी करण्याचा प्रयत्न करा.