उपाशीपोटी-नाश्ता न करता अजिबात खाऊपिऊ नका ८ गोष्टी; पचन बिघडेल आणि तब्येतही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2022 03:09 PM2022-12-01T15:09:01+5:302022-12-01T15:18:38+5:30

Foods to avoid in Empty Stomach सकाळी नाश्ता हवाच, मात्र नाश्ता न करता काहीतरी अरबट चरबट कधीही खाणं हे पोटासाठी त्रासदायक आहे.

सकाळचा नाश्ता राजासारखं, दुपारचं जेवण सामान्य व्यक्तीसारखं आणि रात्रीचं जेवण एखाद्या गरीब माणसासारखं करावं असे आपण अनेक लोकांकडून ऐकलं असेल. मात्र, या धकाधकीच्या जीवनात असे घडताना दिसून येत नाही. काही लोकं पोहे, चहा ब्रेड, अथवा इतर पदार्थ नाश्त्यामध्ये खातात. काही लोकं नाश्ता स्किप करून रात्रीचं जेवण भरपेट करतात. काही लोकं दिवसभर उपाशी पोटी राहून दुपारच्यावेळी विविध पदार्थ खातात. मात्र, असे करणे चुकीचे आहे. अनेकांना आहाराबद्दल जागरूकता नसल्यामुळे उपाशी पोटी काय खाऊ नये याची माहिती नसते. त्यामुळे आहारावर दुर्लक्ष करू नका. असे काही पदार्थ आहेत जे शरीरासाठी उपयुक्त आहेत परंतु, ते उपाशी पोटी खाल्ले की हानिकारक ठरू शकते. कोणते आहेत ते पदार्थ जाणून घ्या.

सकाळी उपाशी पोटी गोड पदार्थ खाऊ नये. सकाळी गोड पदार्थ खालल्याने शरीरातील शुगर लेव्हल वाढते. यासह उपाशी पोटी गोड पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीरातील उर्जा कमी होते. त्यामुळे दिवसभर आपल्याला थकल्यासारखे वाटते.

अनेक लोकं सकाळी नाश्त्यामध्ये सामोसा, कचोरी, मसाला पुरी असे काही पदार्थांचे सेवन करतात. असे पदार्थ खाल्ल्याने पोटात जळजळ होऊ शकते. अनेकदा असे पदार्थ खाल्ल्याने ऍसिडिटी सारख्या समस्या उद्भवतात. उपाशीपोटी हे पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला अपचनाचा त्रास देखील होऊ शकतो.

रताळी शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. मात्र, याचे सेवन सकाळी उपाशी पोटी करू नये. त्यामुळे शरीरात गॅस्ट्रिक, ॲसिडीटीसारख्या समस्या उद्भवू शकतात.

दह्यात भरपूर प्रमाणात लॅक्‍टिक ऍसिड असते. सकाळी उपाशीपोटी दही खाल्ल्याने आपल्या पोटातील आम्लाची पातळी बिघडते. त्यामुळे उपाशी पोटी दही खाऊ नये.

सकाळी उपाशी पोटी थंड पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले नाही. यासह थंड पेय पिल्याने सर्दी, खोकल्यासारखे आजार उद्भवू शकतात. याने पचनक्रिया देखील बिघडते. त्यामुळे सकाळी उपाशी पोटी थंड पेय पिणे टाळावे.

सकाळी उपाशी पोटी कोणत्याही कच्च्या भाज्या खाऊ नये. भाज्यांमध्ये फायबर उपलब्ध असते, जे उपाशीपोटी खाल्ल्याने आपल्या पोटावर त्यांचा भार होऊ शकतो. सकाळी उपाशी पोटी कच्च्या भाज्या खाल्ल्याने पोटामध्ये गॅस सुद्धा होऊ शकतो.

बहुतांश व्यक्तींना सकाळी चहा अथवा कॉफी लागतेच. मात्र, उपाशी पोटी कॉफी पिणे चांगले नाही. उपाशीपोटी कॉफी प्यायल्याने आपल्या शरीरातील ॲसिडिटी वाढते, त्याचबरोबर पचनसंस्थेमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड वाढल्याने पोटाची समस्या निर्माण होते.

सकाळी फक्त दुध पिणे हे आरोग्यासाठी चांगले आहे. मात्र, त्यासह जर आपण केळीचे देखील सेवन करत असाल तर तसं करू नका. कारण दुध आणि केळी खाल्ल्यानं आपल्याला अपचन, गॅस, ॲसिडिटीसारख्या समस्याला सामोरे जावे लागते.