फिटनेससाठी अवघड गोष्टी करायची गरजच नाही; भूमी पेडणेकर सांगतेय सोपे 8 सिम्पल रुल्स By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2022 03:45 PM 2022-02-24T15:45:35+5:30 2022-02-24T16:14:15+5:30
फिटनेस हा ब्युटीचा 'थम्ब रुल' असल्याचं अभिनेत्री भूमी पेडणेकर सांगते. फिटनेस केवळ चित्रपटासाठी नाही तर वैयक्तिक जीवनात आनंदी आणि उत्साही राहायचं असेल तर भूमी म्हणते फिटनेसला पर्याय नाही. त्यासाठी भूमी आहार आणि व्यायामाचे नियम काटेकोर पाळते. भूमी फिटनेस फ्रीक आहे. पण खूप बारीक दिसणं हा तिचा अजेंडा नाही. फिटनेस फाॅलो केला तर फिगर आपोआपच चांगली होते असं भूमीला वाटतं. आपण दिसतो कसं हा मुद्दा नंतरचा आधी आपलं आरोग्य कसं, तब्येत कशी, त्यासाठी आपण काय करतो हे महत्त्वाचं असल्याचं भूमी सांगते. म्हणूनच एकदम वजन कमी करणं. वजन कमी करण्यासाठी काही तरी फॅन्सी किंवा अवघड नियम पाळणं हे भूमीला पटत नाही. भूमी फिटनेससाठी साधे सरळ नियम, ते पाळण्यातला काटेकोरपणा आणि नियमितता याला महत्त्व देते.
व्यायाम आहार याबाबतचे ठरवलेले नियम चित्रपटाच्या सेटवर किंवा सुट्टीसाठी बाहेर गावी अगदी परदेशात गेली तरी पाळणाऱ्या भूमीचं खाण्यावर, पदार्थांच्या वैविध्यावर प्रचंड प्रेम आहे. पण बाहेरच्या पदार्थांपेक्षा घरी तयार केलेल्या जेवणाला भूमी प्राधान्यं देते.
आपला आहार आपल्या आवडीला प्राधान्य देत तज्ज्ञांशी बोलून ठरवलेला आहे. त्यानुसार सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी 50 मिली कोरफडीचा ज्यूस पिते. नाश्त्याला प्रथिनंयुक्त पदार्थ खाते. दुपारच्या जेवणात तूप लावलेल्या दोन् छोट्या पोळ्या, वाटीभर भाजी, सॅलेड आणि जेवणानंतर एक ग्लास प्लेन ताक पिते. संध्याकाळच्या नाश्त्याला कोणतंही हंगामी फळ खाते. बाउलभर कापलेली पपई किंवा एक सफरचंद भूमीच्या संध्याकाळच्या खाण्यातले नेहमीची फळं . फळ्ं खाल्ल्यानंतर एक कपभर ग्रीन टी पिते. रात्रीच्या जेवणात इतर पदार्थांसोबतच हातसडीच्या तांदळाचा भात आणि भाज्या, बिया, सुकामेवा, घाण्याचं तेल घातलेलं सॅलेड हे दोन मुख्य पदार्थ असतात.
आपलं डाएट हे जगावेगळं नसून साधं पण वैविध्याचा आनंद देणारं असतं असं भूमी सांगते. पदार्थांत वैविध्याची आवड जपणारी भूमी खाण्याच्या बाबतीतले काही नियम मात्र अजिबात तोडत नाही. हम्मस हा भूमीचा आवडीचा पदार्थ आहे. पोळी, होलग्रेन ब्रेड, सॅलेड या कशासोबतही भूमी हम्मस खाते. हम्मस हा मध्य पूर्वेकडील देशातला पदार्थ असून त्यात प्रथिनं, फायबर आणि हेल्दी फॅट्स असतात.
भूमी आपल्या आहारात रिफाइन्ड साखरेचे , मैद्याचे पदार्थ खात नाही. ग्लुटेनयुक्त गव्हाचा समावेशही तिच्या आहारात अल्प असून ती आहारात ज्वारी, नागली, राजगिरा यांच्या एकत्रित पिठाच्या पोळ्या यांचा समावेश करते. आहारात साजुक तुपालाही महत्त्व देते. रिफाइंड तेलाऐवजी ती घाण्याचं तेल वापरते. अगदीच कधीतरी रेड वाइन घेणाऱ्या भूमीनं आहाराच्या नियमात नो अल्कोहोल हा नियम पाळण्याला महत्त्व दिलं आहे.
फिट राहायचं तर स्वत:कडे लक्ष द्यायला हवं. हे लक्ष आहारासोबतच फिटनेसच्या बाबतीतही ठेवायला लागतं. आपण ते ठेवलं म्हणूनच जेव्हाही मी आरशासमोर उभी राहाते तेव्हा 'काय जबरदस्त दिसतो आपण!' असं स्वत:चं कौतुक वाटत असल्याचं भूमी सांगते. फिटनेससाठी रोज एक तास भूमी व्यायाम करते. रनिंग, वर्कआउट ऑन मशीन, फंक्शनल ट्रेनिंग, पोहोणं, बाॅलिवूड डान्सिंग या वेगवेगळ्या व्यायाम प्रकारांचा भूमी आपल्या वर्कआउट रुटीनमध्ये समावेश करते. बाॅडी टोन होण्यासाठी आपल्या वर्कआउटमध्ये भूमी हाय इंटेसिंटी कार्डियो या व्यायाम प्रकाराला महत्त्व देते.
फिटनेस राखण्यासाठी व्यायाम आणि आहार यात एखाद्या नवीन नियमाचा, प्रकाराचा समावेश करायचा असल्यास भूमी येत्या सोमवारपासून करु असं ठरवत नाही. जेव्हा मनात आलं तेव्हापासून तिच्या नियमात नवीन गोष्टींचा समावेश ती सहजरित्या करते.
भूमी आपल्या फिटनेस रुल्समध्ये आहार, व्यायाम यासोबतच झोपेचे नियमही काटेकोर पाळते. 7-8 तासांची शांत झोप घेतल्यास कितीही काम असलं तरी थकायला होत नाही, कामाचा ताण येत नाही असं भूमी म्हणते. 7-8 तासांची शांत झोप हे देखील भूमी पेडणेकरच्या जबरदस्त फिटनेसचं रहस्य आहे.