Top 10 food items for winter, you must have these super food items in regular diet
हिवाळ्यात खायलाच हवेत असे १० पदार्थ; वर्षभर तब्येत ठणठणीत आणि त्वचा-केस सुंदर By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2022 12:54 PM2022-01-28T12:54:07+5:302022-01-28T13:03:43+5:30Join usJoin usNext १. बाजरी- आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी थंडीत आवर्जून खायलाच पाहिजेत अशा टॉप १० खाद्यपदार्थांची यादी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या यादीतलं सगळ्यात पहिलं नाव म्हणजे बाजरी. बाजरीमध्ये व्हिटॅमिन बी मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे स्नायूंच्या मजबुतीसाठी आणि केसांच्या आरोग्यासाठी बाजरी खावी, असं त्या सांगतात. भाकरी, खिचडी, थालिपीठ या प्रकारात तुम्ही बाजरी खाऊ शकता. २. डिंक- थंडीचे दिवस सुरू झाले की घरोघरी डिंकाचे पारंपरिक लाडू केले जातातच. हे लाडू हाडांसाठी चांगले असतात. त्यामुळे थंडीत होणारा सांधेदुखी, हाडांचं दुखणं असा त्रास कमी होतो. पचनासाठीही डिंक उत्तम मानला जातो. लाडू, डिंकाचे पाणी, तुपात रोस्ट करून तुम्ही या दिवसांत डिंक खाऊ शकता. ३. हिरव्या पालेभाज्या- पालक, मेथी, पुदिना, सरसो, लसणाची पात अशा हिरव्या भाज्या खाणं या दिवसांत फायदेशीर ठरतं. या भाज्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात ॲण्टी ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन, फायबर असतात. या भाज्या तुम्ही शिजवून, कोशिंबीरी करून किंवा रायतं किंवा वरण करूनही खाऊ शकता. ४. कंद - बीट, गाजर, मुळा या प्रकारचे सॅलड हिवाळ्यात खावे. हे पदार्थ अतिशय पोषक असून वेटलॉससाठी उपयुक्त ठरतात. तसेच पचनासाठीही खूप जास्त फायदेशीर असतात. टिक्की, भाजी, पराठा, कच्चे किंवा कोशिंबीर करून ते तुम्ही खाऊ शकता. ५. हंगामी फळे- पेरू, सिताफळ या हंगामी फळांसोबत सफरचंदही खावे. ताजी फळं खाण्यावर भर द्या. ज्यूस किंवा शेक करण्यापेक्षा फळं तशीच दाताने चावून खा. फळांमध्ये खूप जास्त प्रमाणात मायक्रो न्युट्रीयंट्स, फायबर असतात. ते त्वचेला तजेलदार ठेवण्यासाठी अधिक फायदेशीर आहेत. ६. तीळ- संक्रांतीला आपण तीळ खातोच. पण संक्रांतीपुरताच तिळाचा वापर मर्यादित ठेवू नका. थंडीच्या दिवसांत तीळ आवर्जून खा. कारण तिळामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे फॅटी ॲसिड, व्हिटॅमिन ई असते. ते हाडे, केस आणि त्वचा यांच्यासाठी उत्तम ठरते. चिक्की, लाडू, चटणी अशा पद्धतीने तुम्ही तीळ खाऊ शकता. ७. शेंगदाणे- जगभरातील जे काही सगळ्यात हेल्दी फूड आहेत, त्यांच्यापैकी एक म्हणजे शेंगदाणे. व्हिटॅमिन बी, अमिनो ॲसिड शेंगदाण्यात असते. ते हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. उकडून, भाजून, चटणी करून, लाडू करून किंवा भाज्या, कोशिंबीरी यामध्ये शेंगदाण्याचा कुट टाकून तुम्ही ते खाऊ शकता. ८. तूप- तुपामध्ये खूप जास्त प्रमाणात शरीरासाठी आवश्यक असणारे फॅटी ॲसिड असते. व्हिटॅमिन डी, ए आणि ई देखील तूपातून मिळते. वरण, भात यावर टाकून, पोळी- भाकरीला लावून किंवा खाद्यपदार्थ तुपात करणे, अशा प्रकाराने तुम्ही तूप खाऊ शकता. ९. लोणी- बाजरीची भाकरी आणि लोणी हा तर हिवाळ्याचा पेटंट पदार्थ. याशिवाय वेगवेगळे थालिपीठ, पराठे यासोबती तुम्ही लोणी खाऊ शकता. दोन हाडांमध्ये जे ल्युब्रिकंट्स असतात, त्याचे संतूलन राखण्यासाठी लोणी खाणे फायदेशीर ठरते. १०. कुळीथ- पराठा, वरण किंवा सूप करून कुळीथ खाता येतं. कुळीथ खाण्यामुळे किडनी स्टोनचा धोका कमी होतो. प्रोटीन्सचा तो उत्तम स्त्रोत मानला जातो. फायबर आणि मायक्रो न्युट्रीयंट्स कुळीथातून खूप जास्त प्रमाणात मिळतात. टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सअन्नथंडीत त्वचेची काळजीWeight Loss TipsHealthHealth TipsfoodWinter Care Tips