गरिबांच्या ताटातल्या 'या' भाजीची भलतीच वाढली मागणी! विदेशी पर्यटकही करतात किलो- किलोने खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2025 18:25 IST2025-04-15T18:21:00+5:302025-04-15T18:25:25+5:30

सध्या राजस्थान येथे मिळणारी एक भाजी खूपच जास्त चर्चेत आहे. ही भाजी फक्त उन्हाळ्याच्या दोन महिन्यांतच मिळते. पुर्वी ही भाजी फक्त राजस्थानातल्या काही गरीब लोकांच्या ताटात दिसायची. पण आता मात्र या भाजीची मागणी आणि भाव दोन्हीही खूप वाढले आहे.
केर असं त्या भाजीचं नाव असून ती जोधपूर प्रांतात मिळते. जोधपूर आणि तेथील काही भागात या भाजीचं पिक घेतलं जातं. राजस्थानचा सुकामेवा म्हणूनही ती ओळखली जाते.
सध्या ही भाजी २५० रुपये ते ४०० रुपये किलो या दराने मिळते आहे. या भाजीचं वैशिष्ट्य असं की ती वर्षभर चांगली टिकते. त्यामुळे लोक ती एकदाच भरपूर प्रमाणात खरेदी करतात कारण उन्हाळा सरला की नंतर वर्षभर ती मिळत नाही.
राजस्थान, जोधपूर या भागात भेट देणारे विदेशी पर्यटकही केर अगदी आवर्जून खरेदी करून त्यांच्या देशात घेऊन जात आहेत कारण ते आरोग्यासाठी अतिशय चांगले असतात..
केरची भाजी आणि लोणचं असं दोन्हीही करता येतं. राजस्थानातल्या अनेक घरांमध्ये वर्षभर पुरेल एवढं केरचं लोणचं एकदाच घातलं जातं.
उन्हाळ्यात राजस्थान सहलीसाठी जाणार असाल तर केर घेऊन या आणि त्याचं चटपटीत लोणचं घालून पाहा.. दमा, अस्थमा, ॲसिडीटी, हाडांचं दुखणं, ताप, खोकला, मधुमेह असे त्रास कमी करण्यासाठी ही भाजी उपयुक्त ठरते.