त्वचेचं तारुण्य टिकविण्यासाठी 'या' पद्धतीने वापरा लवंग! वय वाढलं तरी त्वचा सुरकुतणार नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2025 09:20 IST2025-01-11T09:15:58+5:302025-01-11T09:20:01+5:30

वय वाढलं की त्वचेवर सुरकुत्या येणं हे खूप नैसर्गिक आहे. पण त्वचेची योग्य काळजी घेतली गेली नाही, तिला व्यवस्थित हायड्रेटेड ठेवलं नाही तर कमी वयातच त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात.

यामुळे मग योग्य वेळीच त्वचेची योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी बाजारात मिळणारे महागडे प्रोडक्टच वापरायला हवेत, असं मात्र मुळीच नाही. आपल्या स्वयंपाक घरातले काही पदार्थही त्वचेसाठी उत्तम सौंदर्य प्रसाधन म्हणून काम करतात.

त्यापैकीच एक आहे लवंग. लवंगमध्ये असणारे काही घटक त्वचेतला घट्टपणा टिकवून ठेवण्यास मदत करतात (use of clove oil for reducing fine lines or wrinkles). त्यामुळे त्वचेवर अकाली येणाऱ्या सुरकुत्या कमी करायच्या असतील तर लवंगचा वापर एका खास पद्धतीने करा असं सौंदर्यतज्ज्ञ सांगतात.(how to get wrinkle free young skin?)

यासाठी अर्धा कप खोबरेल तेल किंवा बदाम तेल घ्या आणि त्यामध्ये १ चमचा लवंग पावडर टाका. हे तेल १० ते १५ मिनिटे मध्यम आचेवर उकळायला ठेवा.

त्यानंतर गॅस बंद करा आणि तेल थंड झाल्यानंतर गाळून घ्या. हे तेल एका बरणीमध्ये भरून ठेवा.

दररोज रात्री झोपण्यापुर्वी हे लवंग तेल ३ ते ४ थेंब हातावर घ्या आणि त्याने चेहऱ्याला मसाज करा. रात्रभर तेल असेच त्वचेवर राहू द्या.

दुसऱ्या दिवशी कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. त्वचेचं तारुण्य आणि सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होईल. पण हे तेल सगळ्यांच्याच त्वचेला चालेल असं नाही. त्यामुळे आधी पॅच टेस्ट घ्या आणि नंतरच ते संपूर्ण चेहऱ्याला लावा.