ठंडा ठंडा कूल कूल... पुन्हा एकदा वाळ्याच्या टोप्यांची क्रेझ, सुगंध अन् गारव्याचं खास कॉम्बो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 14:08 IST2025-04-10T09:25:49+5:302025-04-10T14:08:08+5:30
Vetiver cap : अनेकांना हे माहीत नसतं की, वाळा पाण्याला सुगंध देण्यासोबतच वेगवेगळ्या वस्तू तयार करण्यासाठी सुद्धा कामात येतो.

Vetiver cap : उन्हाळा सुरू झाला की, बाजारात थंड पाण्यासाठी मातीची मडके, वेगवेगळी थंड फळं यासोबतच आणखी एका गोष्टीची लोक भरपूर खरेदी करतात. ती म्हणजे वाळा. पाण्याला छान सुगंध यावा आणि थंड रहावं यासाठी फार पूर्वींपासून वाळ्याचा वापर केला जातो.
सामान्यपणे वर्षभर दुर्लक्षित राहणाऱ्या वाळ्याची आठवण उन्हाळा सुरू होताच येते. अनेकांना हे माहीत नसतं की, वाळा पाण्याला सुगंध देण्यासोबतच वेगवेगळ्या वस्तू तयार करण्यासाठी सुद्धा कामात येतो.
सध्या सोशल मीडियावर वाळ्याच्या टोपीची चांगलीच चर्चा रंगली आहे. डोकं किंवा शरीर थंड ठेवण्यासाठी या खास नॅचरल टोपीचा वापर केला जात आहे. तसेच याचे अनेक आरोग्यदायी फायदेही मिळतात.
साताऱ्यामध्ये किंवा राज्यातील इतरही काही शहरांमध्ये सध्या या टोप्यांची खूप मागणी वाढली आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, या टोप्यांना 150 ते 500 रूपये इतकी किंमत मिळत आहे.
बाजारात वेगवेगळ्या स्टाईल आणि डिझाइनच्या टोप्या लोकांना आकर्षित करीत आहेत. या टोप्यांनी डोकं, चेहरा आणि डोळ्यांनाही थंडावा मिळतो. सोबतच मन मोहून टाकणारा सुगंधीही सोबत राहतो.
आधी या वाळ्यांच्या टोप्यांचा वापर ग्रामीण भागांमध्ये खूप केला जात होता. मात्र, काही वर्ष त्यांची बाजारात विक्री कमी होत होती. आता पुन्हा एकदा वाळ्याच्या टोपीला महत्व निर्माण झालं आहे.
तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण वाळा फेसपॅक, आयुर्वेदिक औषधं, साबण, अत्तर आणि तेल बनवण्यासाठीही कामात येतो. इतकंच पाणी तर वाळ्यानं पाण्याला केवळ सुगंध मिळतो असं नाही तर पाण्यातील अनेक दोषही कमी होतात. मुळात वाळा शीतल असल्यानं उष्णतेमुळे होणारे अनेक आजारही दूर करता येतात.
वाळ्याची लागवड तुम्ही घरच्या बागेत किंवा कुंडीतही करू शकता. मुळं कापल्यानंतर जे हिरवं गवत शिल्लक राहतं ज्याला थोंब म्हणतात. त्याची रोपं सहजपणे नर्सरीमध्ये मिळू शकतात. जी तुम्ही घरी लावू शकता.