भारतातल्या १० सुप्रसिध्द साड्या, तुमच्याकडे यापैकी किती साड्या आहेत? बघा, तपासा यादी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2022 01:03 PM2022-12-21T13:03:22+5:302022-12-23T15:44:24+5:30

१. एखादी भारतीय स्त्री कितीही पाश्चिमात्य विचारांची असली आणि कायम वेस्टर्न कपड्यात वावरत असली तरी सणावाराला किंवा काही खास प्रसंगी तिला हमखास साडीची आठवण येतेच.. म्हणूनच तर साडी हा प्रत्येक भारतीय स्त्री च्या जीवनातला एक अविभाज्य भाग आहे.

२. इतर कुठल्याही पेहरावापेक्षा साडीमध्ये स्त्रियांचं सौंदर्य आणखी खुलून येतं असं म्हणतात. म्हणूनच तर परदेशी स्त्रियांनाही साडीचा मोह होतोच.. त्यामुळेच तर भारतात पर्यटनासाठी आलेल्या अनेक परदेशी स्त्रिया जाताना त्यांच्यासोबत एखादी पारंपरिक धाटणीची साडी नक्कीच घेऊन जातात आणि आवर्जून नेसतातही..

३. साडीचं हे सौंदर्य आणि पारंपरिक साड्या विणण्याची कला याची जगाला ओळख व्हावी म्हणून २१ डिसेंबर हा दिवस जागतिक साडी दिवस म्हणून साजरा केला जातो. याच अनुशंगाने आपण प्रसिद्ध भारतीय साड्या कोणत्या ते पाहूया..

४. साड्यांची महाराणी पैठणीशिवाय महाराष्ट्रातील लग्नसोहळा अपूर्णच असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हल्ली पैठणीमध्ये लोटस पैठणी, डॉलर पैठणी, बालगंधर्व पैठणी, पेशवाई पैठणी, महाराणी पैठणी हे प्रकारही मिळत आहेत.

५. अतिशय तलम पोत अशी तामिळनाडूच्या कांजीवरम साडीची ओळख आहे. अनेक नववधू हमखास ही साडी घेतात. कांजीवरम साडीला दक्षिण भारताच्या काही भागांमध्ये ब्राईडल सिल्क साडी म्हणूनही ओळखलं जातं.

६. लग्नासाठी अनेक नववधूंची पहिली पसंती मिळते ती बनारसी साडीला म्हणजेच शालूला. अतिशय हेवी वर्क हे या साडीचं वैशिष्ट्य. ४- ५ हजारांमध्येही चांगल्या प्रकारची बनारसी साडी मिळू शकते.

७. कसावू साडी ही केरळमधली प्रसिद्ध साडी. तिथे नववधू लग्नात ही साडी हमखास नेसते. चमकदार मोतिया रंगाची साडी आणि त्याला सोनेरी काठ अशा पद्धतीची ही सिल्कची साडी असते.

८. उपाडा सिल्क ही आंध्र प्रदेशची निर्मिती असणारी साडी भारतभर प्रसिद्ध आहे. जमदानी साडीचं अधुनिक रूप म्हणून उप्पाडा साडी ओळखली जाते. कारण तिच्यावर खूप अधिक प्रमाणात जरीकाम केलेलं आहे. सिल्क किंवा कॉटन सिल्क या दोन्ही प्रकारात ही साडी मिळते.

९. म्हैसूर सिल्क ही कर्नाटकची ओळख. कॉटन सिल्क या प्रकारात साडी उपलब्ध असते. या साडीचे काठ तुलनेने लहान असतात आणि त्यावर नाजूक बुट्टी असते.

१०. बांधणी किंवा बांधेज साडी हे गुजरातचं वैशिष्ट्य. तेथील महिला शुभप्रसंगी हमखास बांधणी साडी नेसतात. टाय- डाय प्रकारातून या साडीवरच्या नक्षींची निर्मिती केली जाते.

११. गुजरातची आणखी एक साडी प्रसिद्ध आहे. ती म्हणजे पटोला सिल्क साडी. अतिशय भरगच्च काम हे या साडीचं वैशिष्ट्य. पुर्वी फक्त राजघराण्यातील किंवा श्रीमंत स्त्रियाच या साड्या नेसायच्या. कारण त्या खूपच महागड्या असायच्या. आता मात्र २ हजार रुपयांपासूनही पटोला सिल्क मिळते.

१२. पोचंपल्ली साडीचं डिझाईन वरवर पाहता पटोला सिल्क साडीसारखंच वाटतं. पण टाय- डाय आणि एम्ब्रॉयडरी असं दोन्ही काम या साडीवर केलेलं असतं. तेलंगणाच्या नळगोंडा जिल्ह्यात ही साडी प्रामुख्याने तयार केली जाते.

१३. मुगा सिल्क ही साडी म्हणजे आसामची ओळख. या साडीचं सिल्क अतिशय टिकाऊ असतं. मुळातच या सिल्कचा रंग पिवळसर- सोनेरी प्रकारातला असतो आणि त्याच्यावर खूप चमक असते.