'आता ए साला कप नामदू' म्हणत स्मृती मंधाना जिंकली मनं; जे पुरुष संघालाही जमलं नाही.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2024 03:09 PM 2024-03-18T15:09:12+5:30 2024-03-18T15:16:15+5:30
वूमन्स प्रिमियर लीग २०२४ या नुकत्याच झालेल्या स्पर्धेचे विजेतेपद राॅयल चॅलेंजर्स बेंगळुरु (RCB) या संघाने कर्णधार स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली पटकावले. त्यानंतर संघाच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला.
रविवार दि. १७ मार्च रोजी स्पर्धेचा अंतिम सोहळा पार पडला. यामध्ये RCB ने दिल्ली कॅपिटल्सचा ८ विकेट्सने दणदणीत पराभव केला. सामन्याच्या शेवटी स्मृतीने जी प्रतिक्रिया दिली, ती चर्चेचा विषय ठरली.
'आता ए साला कप नामदू' असं म्हणत तिने तिच्या जल्लोषाचा आनंद व्यक्त केला. RCB हा संघ जेव्हा जेव्हा मैदानात उतरायचा तेव्हा ते एकमेकांना 'ए साला कप नामदे' असं म्हणायचे. कानडी भाषेत याचा अर्थ असा की 'यावर्षी कप आमचा असेल'. म्हणूनच विजयी झाल्यानंतर तिने संघाला आणि चाहत्यांना उद्देशून 'आता ए साला कप नामदू' असं म्हटलं याचा अर्थ 'आता कप आमचा झाला आहे...'
सुरुवातीच्या सामन्यांमध्ये RCB संघाला हार पत्करावी लागली होती. आमच्या त्या अपयशाने आम्हाला खूप काही शिकवले. आमच्या चुका त्यातून लक्षात घेत आम्ही योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याबाबत नेहमीच चर्चा करत गेलो आणि आज अखेरी विजयी झालाे, अशा भावनाही स्मृतीने व्यक्त केल्या.
या यशामुळे स्मृतीचे नेतृत्वगुण, तिची समज आणि संघाला बांधून ठेवण्याचे तिचे कौशल्य यांची नव्याने चर्चा होत आहे.