आयुषमान खुरानाच्या पत्नी ताहिरा कश्यपला पुन्हा कॅन्सर रिलॅप्स, ७ वर्षांनंतर कॅन्सर पुन्हा आला आणि..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2025 17:25 IST2025-04-09T16:03:13+5:302025-04-09T17:25:19+5:30

लेखिका, निर्माती आणि अभिनेता आयुषमान खुराणा याची पत्नी ताहिरा कश्यप हिला पुन्हा एकदा कॅन्सरने गाठलं आहे. ७ वर्षांपुर्वी ताहिराला झीरो स्टेज ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर तिने सगळे उपचार घेतले आणि ती या आजारातून बाहेर पडली.

पण आता तिने नुकतीच सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली असून या पोस्टद्वारे तिने तिला पुन्हा एकदा कॅन्सरने गाठलं असल्याचं सांगितलं आहे... ही गोष्ट तिच्यासाठी, तिच्या कुटुंबासाठी तर खूपच धक्कादायक आहे.

हा आजार तिची पाठ सोडेना हे पाहून ताहिराचे चाहतेही पुरते भांबावून गेले आहेत. एकदा तो त्रास सहन केल्यानंतर पुन्हा त्यातूनच जाणे मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या खूप कठीण आहे...

पण तरीही ताहिरा मात्र पुन्हा एकदा मोठ्या हिमतीने पुढच्या उपचारांसाठी खंबीरपणे सज्ज झाली आहे. याविषयी तिने एक खूप छान पोस्ट शेअर केली असून ती पोस्ट वाचून क्षणभर मन हेलावून जातं.. पण पुन्हा पुढच्याच क्षणी तिच्या हिमतीला आणि आलेल्या प्रसंगाला सकारात्मकतेने सामोरं जाण्याच्या तिच्या वृत्तीला दाद देऊ लागतं..

ताहिरा म्हणते की ती नियमितपणे कॅन्सरविषयीच्या चाचण्या करत होती, त्यामुळेच हा आजार झाल्याचं तिच्या पुन्हा एकदा लक्षात आलं. तिने प्रत्येक महिलेलाच हा सल्ला दिला आहे आणि नियमितपणे मेमोग्राम करा असं सुचवलं आहे.

ताहिरा म्हणते आता माझा कॅन्सरचा दुसरा राऊंड सुरू झाला आहे.. तुमच्या नशिबाने तुमच्याकडे लिंबू फेकलं तर त्याचं लिंबू सरबत करून प्या.. जर नशीब खूपच उदार झालं आणि त्याने पुन्हा एकदा तुमच्याकडे लिंबूच फेकलं तर तुमच्या आवडीच्या काला- खट्टा ड्रिंकमध्ये ते पिळा आणि त्याचा आनंद घ्या.. कारण तुम्हाला माहिती आहे की ते एक चांगलं पेय आहे आणि दुसरं म्हणजे तुम्ही पुन्हा एकदा तुमच्यातलं सर्वोत्तम देणार आहात...

खरंच ताहिरासारखी हिंमत आणि सकारात्मकता सगळ्यांकडेच नसते.. कोणत्याही संकटातून बाहेर पडण्यासाठी या दोन गोष्टीच सगळ्यात जास्त गरजेच्या आहेत आणि त्या ताहिराकडे पुरेपूर आहेत.. त्यामुळेच तर तिला स्वत:ला आणि तिच्या चाहत्यांनाही ती या आजारातून पुन्हा एकदा पुर्णपणे बरी होऊन बाहेर पडणार असा विश्वास आहे...