पोट डब्ब होतं, नीट साफ होत नाही? १५ दिवस फक्त ५ व्यायाम करा, त्रास होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2024 05:59 PM2024-07-31T17:59:44+5:302024-07-31T19:03:16+5:30

काही जणांना पोटाचा खूपच त्रास असतो. खाण्यापिण्यात थोडं फार कमी जास्त झालं की लगेच बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. (yogasana for constipation problem)

पोट साफ होण्यासाठी रोजच जोर लावावा लागतो. शिवाय जोर लावूनही पोट साफ होईलच याचा काही नेम नसतो. (How can I poop more regularly?)

हा त्रास कमी करण्यासाठी काही योगासनं नक्कीच उपयोगी पडू शकतात. ती योगासनं नेमकी कोणती याविषयीचा एक व्हिडिओ fitmom.club या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. (how to get rid of indigestion and gases problems )

त्यात सांगितलेलं पहिलं आसन म्हणजे मलासन. सकाळी उठल्यानंतर मलासनात बसा आणि तसे बसूनच तुम्हाला शक्य होईल तेवढे एक ते दीड ग्लास कोमट पाणी प्या.

त्यानंतर मलासनात बसूनच काही हालचाली करा. यामध्ये उजवा गुडघा डाव्या तळपायाच्या समोर जमिनीला टेकवा. त्यानंतर डाव्या पायाचा गुडघा उजव्या तळपायाच्या समोर जमिनीला टेकवा. असे प्रत्येकी ५- ५ वेळेस करा

यानंतर एक ते दीड मिनिटांसाठी ताडासन करा.

त्यानंतर ताडासन करूनच एकदा डाव्या बाजूला तर एकदा उजव्या बाजूला कंबरेतून वाका. दोन्ही बाजूने प्रत्येकी ५- ५ वेळेस हा व्यायाम करावा. यालाच तिर्यक ताडासन असं म्हणतात.

त्यानंतर कटी चक्रासन हा व्यायाम करा. यामध्ये दोन्ही पाय जमिनीवर स्थिर ठेवून एकदा उजव्या बाजूला तर एकदा डाव्या बाजूला वळून मागची भिंत पाहण्याचा प्रयत्न करा. हा व्यायाम दोन्ही बाजूने प्रत्येकी ५- ५ वेळा करा.

यानंतर भुजंगासन करा. भुजंगासन अवस्थेत असताना एकदा उजव्या बाजूने वळून डावा तळपाय बघा. तर त्यानंतर डाव्या बाजूने मान वळवून उजवा तळपाय पाय बघण्याचा प्रयत्न करा. हा व्यायामही दोन्ही बाजूंनी प्रत्येकी ५- ५ वेळा करावा.