सातारा : वेडीवाकडी वळणं अन् हिरवीगार झाडी; देशातील सर्वाधिक उंचीचा धबधबा, PHOTOS

By ओमकार संकपाळ | Published: July 1, 2024 01:03 PM2024-07-01T13:03:37+5:302024-07-01T13:47:07+5:30

पेट्री येथील भांबवली वजराई धबधबा म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच.

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील पेट्री येथील भांबवली वजराई धबधबा म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच. हिरव्यागर्द झाडीतील धुके आणि पावसाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येथे हजेरी लावतात.

यंदाच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. मात्र, यावेळी पर्यटकांना धबधब्याचे सौंदर्य पाहण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत. एका व्यक्तीमागे ५० रूपये द्यावे लागतील.

सातारा शहराच्या पश्चिमेस मागील दोन आठवड्यांपासून पावसाने अधूनमधून दमदार हजेरी लावली आहे. पाऊस संततधार सुरू असल्याने छोटे-मोठे धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधू लागले आहेत. खरे तर भांबवली वजराई धबधब्याचा हंगाम सुरू झाल्याने प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

देशातील सर्वाधिक उंचीचा भांबवली वजराई धबधबा आता पर्यटन विकासासाठी सज्ज झाला आहे. येथील परिसर डोंगराळ असून, घनदाट झाडीचा असल्यामुळे पर्यटकांना चालताना कसरत करावी लागते. विशेष करून वयस्कर पर्यटकांची मागणी होती की चालण्यासाठी सोयीस्कर पायवाट व्हावी.

पण, वनविभागाने जांभ्या दगडाची पायवाट करून दिली असली तरी ती तितकीशी सोयीची नाही. कारण प्रेक्षकांना धबधब्यापर्यंत पोहोचता येत नाही. तरीदेखील अतिउत्साही पर्यटक दाट झाडीतून चिखल तुडवत धबधब्यापर्यंत पोहोचतात.

कास पठारापासून काहीशा अंतरावर असलेल्या भांबवली वजराई धबधब्याला पर्यटक प्रामुख्याने जुलै-ऑगस्ट महिन्यांत भेट देतात. भांबवलीतील सध्याचे वातावरण मनमोहक असून, पावसाच्या सरी, गार-गार वारा, रानकिड्यांचे आवाज, हिरवी गर्द झाडी, धबधब्याच्या पाण्याचा प्रचंड प्रपात, निसर्गाचा खुललेला नजारा पाहून मन प्रफुल्लित होत आहे.

भांबवली वजराई धबधब्याला २०१८ मध्ये 'क' वर्ग पर्यटनस्थळ म्हणून मान्यता मिळून धबधब्याच्या विकासाचे काम सुरू झाले. घनदाट जंगल, दुर्गम डोंगरातून जाताना पर्यटकांना कसरत करावी लागायची.

पहिल्या टप्प्यातील पायऱ्या, रेलिंगच्या कामामुळे डोंगरातून घसरगुंडीची समस्या दूर झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात वाॅच टाॅवर व पॅगोडाचे काम झाले असून, निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता येत आहे.

तिसऱ्या टप्प्यातील बांबू (गेस्ट) हाऊसचे काम पूर्ण झाले असून, पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा आनंद मिळतो आहे.

दरम्यान, या धबधब्यामुळे भांबवली येथील ग्रामस्थांना पावसाळ्याच्या दिवसात रोजगार उपलब्ध होतो. स्थानिक ग्रामस्थ भाजी भाकरी, चपाती व इतर पदार्थांची विक्री करतात.

कास पठारापासून जवळ असलेला वजराई धबधबा मुख्य रोडपासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे. चिखल आणि घनदाट झाडीमुळे अद्याप चांगल्या रोडची व्यवस्था नाही. म्हणूनच पर्यटकांना १००-२०० मीटर लांबून धबधबा पाहावा लागतो.

धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी पायवाट असली तरी जोखीमही तितकीच आहे.