Rohit Pawar: पुन्हा साताराच! छत्री हातात, तरीही रोहित पवार भिजले पावसात By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 09:17 AM 2022-08-08T09:17:55+5:30 2022-08-08T09:35:21+5:30
देशाच्या राजकारणातील सुसंस्कृत नेते आणि हिमालयाच्या मदतीला धावून गेलेला सह्याद्री असं ज्यांचं वर्णन केलं जातं त्या माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या कराड येथील प्रीतिसंगम या समाधीस्थळी बाबांसह भेट देऊन अभिवादन केलं. नेहमीप्रमाणे आजची भेटही प्रेरणादायी होती, अशी माहिती रोहित यांनीच ट्विटरवरुन दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकांवेळी भरपावसात भिजून साताऱ्यातील सभेला संबोधित केले होते. पवार यांचा हा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरुद्ध त्यांनी घेतलेल्या सभेनं ऐतिहासिक नोंद केली. विशेष म्हणजे या सभेचा परिणाम मतदारांच्या कौलमध्येही दिसून आला. कारण, उदयनराजेंना येथे पराभवाचा सामना करावा लागला.
शरद पवारांच्या या पावसातील सभेची आणि पावसातील फोटोची गावागावात आणि वाड्या वस्त्यांवरही चर्चा रंगली. त्यानंतर, पाऊस आणि राजकीय नेत्यांच्या सभा हे चर्चेचा विषय बनत गेलं.
अनेक राजकीय नेत्यांच्या सभा पावसात झाल्या, पावसात भिजल्याचे त्यांचे फोटोही समोर आले. मात्र, शरद पवारांच्या फोटोची आणि पावसाची जी चर्चा झाली ती इतर कोण्याचीही दिसून आली नाही.
सध्या शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रा करत आहेत. या दरम्यान त्यांनीही पावसात भिजून सभा घेतल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे यावेळी त्यांना छत्री ऑफर करण्यात आली होती. मात्र, त्यांनीही छत्री नाकारल्याचं पाहायला मिळालं.
आता, राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोत ते हातात छत्री असताना पावसात भिजताना दिसून येतात.
पावसात भिजत त्यांनी फोटोसाठी पोज दिली आहे. त्यावेळी, त्यांच्या हातात छत्री दिसून येते. या फोटोवरुन त्यांना ट्रोल करण्यात येत असून हातात छत्री असतानाही पावसात भिजण्याचं कारण काय? असा सवाल त्यांना विचारला जात आहे.
रोहित पवार यांनी साताऱ्यातील कराड येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला भेट दिली. त्यावेळी, दर्शन घेतल्यानंतर त्यांनी येथे फोटोही काढले. या दरम्यान, रिमझिम पाऊस सुरू होता.
देशाच्या राजकारणातील सुसंस्कृत नेते आणि हिमालयाच्या मदतीला धावून गेलेला सह्याद्री असं ज्यांचं वर्णन केलं जातं त्या माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या कराड येथील प्रीतिसंगम या समाधीस्थळी बाबांसह भेट देऊन अभिवादन केलं. नेहमीप्रमाणे आजची भेटही प्रेरणादायी होती, अशी माहिती रोहित यांनीच ट्विटरवरुन दिली आहे.
आपल्या ट्विटरर अकाऊंटवरुन रोहित पवार यांनी प्रीतिसंगम येथील समाधीस्थळाचे दर्शन घेतानाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये त्यांच्यासमेवत त्यांचे वडिलही दिसून येतात. वडिलांनी डोक्यावर छत्री घेतल्याचेही फोटोत दिसते.