कणकवलीच्या 'स्वप्नाली'ला थेट पंतप्रधान कार्यालायकडून 'हायस्पीड' मदत By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 04:51 PM 2020-08-26T16:51:31+5:30 2020-08-26T17:14:47+5:30
कणकवली तालुक्यातील दुर्गम अशा दारिस्ते गावातील स्वप्नाली गोपीनाथ सुतार हिचे डोंगर पठारावरील ऑनलाईन शिक्षण संपादन करण्याचे अथक प्रयत्न ‘लोकमत’ने जनसामान्यांसमोर आणले.
त्यानंतर स्वप्नालीकडे मदतीचा ओघ सुरू झाला आहे. मदतीच्या रुपाने माणुसकी अवतरल्याने ती भारावून गेली आहे.
प्राण्यांप्रती असलेल्या प्रेमापोटी स्वप्नालीने मुंबईत पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाची ३ वर्षे पूर्ण केली आहेत. अजून दीड वर्षाचा कालावधी आणि त्यानंतर एक वर्षाचा अनुभव प्रशिक्षणाचा कालावधी शिल्लक आहे. सध्या कोरोनाच्या कालावधीत ती आपल्या मूळ गावी दारिस्ते येथे परतली आहे
तिथे तिचे आॅनलाईन शिक्षण सुरू आहे. हे शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी ‘लोकमत’ने ‘या झोपडीत माझ्या.. ’ या शिर्षकाखाली मांडल्या होत्या. त्यानंतर तिला मदतीसाठी अनेक हात पुढे सरसावले आहेत. सोन सूदही तिच्या मदतीसाठी पुढे सरसावला
तर, तिच्या आॅनलाईन अभ्यासासाठी आवश्यक असलेला लॅपटॉप कणकवली येथील ‘आम्ही कणकवलीकर’ परिवारातर्फे श्री गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर तिला जिद्दीचे बक्षीस म्हणून सुपुर्द करण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींना सेवा पुरविणाºया भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेडने (बी.बी.एन.एल) प्रथमच दुर्गम भागात सेवा दिली आहे. या कंपनीने स्वप्नालीच्या घरात अखंडित सेवा मिळण्यासाठी जोडणी दिली असल्याची माहिती तिचे वडील गोपीनाथ सुतार यांनी दिली. विविध खात्याचे मंत्री, आमदार, खासदार तसेच उद्योगपती, दानशूर व्यक्तीनीही स्वप्नालीशी संपर्क साधत मदत देण्याची तयारी दर्शविली आहे.
राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत, पीएमओ कार्यालयातून स्वप्नालीला मदत मिळाल्याचं त्यानी म्हटलं.
विजया रहाटकर यांनी स्वप्नालीचे दोन फोटो शेअर केले आहेत, आधी आणि नंतर या फोटोसह स्वप्नालीला सुविधा मिळाल्याचं त्यांनी ट्विटरवरुन सांगितलं
केवळ इंटरनेट कनेक्शन नसल्याने डोंगरावर जाऊन अभ्यास करावा लागत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वप्नाली सुतारचा वनवास आता संपला आहे.
प्रधानमंत्री कार्यालयाने भारत नेट योजनेअंतर्गत स्वप्नाली च्या दारिस्ते गावात अवघ्या दोन दिवसात #केंद्र शासनाकडून हायस्पीड इंटरनेट कनेक्शन जोडून देण्यात आले
स्वप्नालीला आता गावात बसूनच आपले ऑनलाईन शिक्षण पूर्ण करता येणार आहे