जिद्दीला सलाम! कॅन्सरवर मात केली; लकव्यामुळे उभं राहणं कठीण, तरीही 'बॉडी बिल्डर' बनला

By manali.bagul | Published: September 21, 2020 12:45 PM2020-09-21T12:45:50+5:302020-09-21T13:13:07+5:30

'प्रयत्नांती परमेश्वर' हे खरंच आहे. अनेकजण आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी प्रयत्नांची पाराकाष्टा करतात. कितीही संकट येवोत किंवा समस्यांचा सामना करावा लागला तरी नेहमीच जिद्दीने आपलं ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करत असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच होतकरू तरूणाची प्रेरणादायी कहाणी सांगणार आहोत.

या बॉडी बिल्डरचं नाव आनंद अर्नॉल्ड आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण आनंदनं व्हिल चेअरवर बसल्याबसल्या स्वतःला घडवलं आहे. अशी शरीरयष्टी मिळवण्यासाठी व्हिल चेअरवर बसून आनंदला खूप मेहनत घ्यावी लागली.

कमी वयातच आनंदने हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. वयाच्या तेराव्या वर्षापासून आनंदला रोज जीमला जाऊन तासनतास व्यायाम करण्याची सवय होती. व्यायाम हा त्याच्या आयुष्यातील महत्वाचा भाग बनला होता.

वयाच्या १५ व्या वर्षी एका एका बॉडी बिल्डींग स्पर्धेत आनंदनं भाग घेतला होता. परंतू पाठीच्या हाडांचा त्रास उद्भवल्यामुळे त्याला या स्पर्धेत यश मिळवता आलं नाही. वैद्यकीय तपासणी दरम्यान निदर्शनास आलं की, पाठीच्या मणक्यांचा खालच्या भागात कॅन्सर आहे.

आनंदच्या आयुष्यातील हा सगळ्यात कठीण काळ होता. डॉक्टरांनी सांगितले होते की, लवकरत लवकर ऑपरेशन करून कॅन्सरवर उपचार करावे लागतील. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे ऑपरेशन करण्यात आलं.

त्यानंतर लकवा झाल्यामुळे आनंदच्या दोन्ही पायांची कार्यक्षमता कमी झाली. त्यामुळे दोन्ही पायांवर उभं राहून चालता येणं शक्य नव्हतं. इतकंच नाही तर मानेच्या खालच्या भागाचीही कार्यक्षमता कमी झाली होती.

लुधियानाचा रहिवासी असलेल्या आनंदला यावेळी आपलं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही असं वाटू लागलं होतं. कारण आजारपणामुळे संपूर्णवेळ अंथरूणात पडून राहावं लागत होतं.

जवळपास तीन वर्ष असंच सुरू राहिलं. या कठीण काळात आनंदचे मित्र आणि कुटुंबियांनी पुरेपूर साथ दिली. लकवा असल्यामुळे कमरेच्या खालच्या भाग पूर्णपणे काम करेनासा झाला होता. म्हणून आनंदने व्हिलचेअरवर बसून व्यायाम करण्याचं ठरवलं.

पुन्हा एकदा आनंदला जीममध्ये बघून सगळेचजण हैराण झाले. आज अखेर आनंदचे बॉडी बिल्डर बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. काही दिवसांपूर्वी आनंदला अंथरूणातून उठण्यासाठी त्रास व्हायचा. आज आनंद अनेक किलो वजन आरामात उचलू शकतो.

आतापर्यंत अनेक बॉडी बिल्डिंग स्पर्धांमध्ये आनंदने यश मिळवलं आहे.

आतापर्यंत अनेक बॉडी बिल्डिंग स्पर्धांमध्ये आनंदने यश मिळवलं आहे. तब्बल १२ वेळा मिस्टर पंजाब, ३ वेळा मिस्टर इंडिया आणि एकदा मिस्टर वल्ड चा मान आनंदला मिळाला आहे.

आनंदला लोक प्रेमानं मिस्टर 'व्हिलचेअर बॉडी बिल्डर' असं म्हणतात. आनंद यांची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. (Image credit _ instagram/ mr.world arnold)