चहाला वेळ नसते पण वेळेला चहा लागतो; म्हणूनच चहावालाही कोट्याधीश होतो; वाचा चहावाल्यांची यशोगाथा! By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 02:59 PM 2023-11-17T14:59:46+5:30 2023-11-17T15:06:47+5:30
भारतात तरुणांची संख्या जास्त असल्याने आपल्या देशाला तरुणांचा देश म्हणतात. पण तरुणांच्या हाताला काम नाही, बेरोजगारी आहे, अशीही ओरड कानावर पडते. पण इच्छाशक्ती प्रबळ असेल तर रोजगार निर्मितीलाही भारतात पुरेपूर वाव आहे. अगदी चहाची टपरीसुद्धा तुम्हाला लखपती, कोट्याधीश, अब्जाधीश बनवू शकते. फक्त चिकाटीने व्यवसाय उंचीवर नेण्याची ताकद आणि संयम हवा. यासाठीच भारतातल्या पाच कोट्याधीश चहावाल्यांची कहाणी तुम्हाला सांगणार आहोत. त्यांचा प्रवास कसा सुरु झाला इथपासून ते यशस्वी कसे झाले, याबद्दल शेवट्पर्यंत माहिती नक्की वाचा. भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा चहा उत्पादक देश आहे आणि टी बोर्ड ऑफ इंडियाने केलेल्या सर्वेक्षणानुसार, भारतातील एकूण कुटुंबांपैकी सुमारे ८८% लोक दैनंदिन जीवनात चहाचा वापर करतात. एकूणच, भारतातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ६४% लोक चहा पितात. त्यामुळेच की काय, अनेक चहा-आधारित स्टार्टअप्सच्या आगमनाने व्यवसाय भरभराट होत आहेत. एवढेच नाही तर या चहा स्टार्टअपच्या माध्यमातून अनेक लोक लखपती आणि करोडपती झाले आहेत. अशाच पाच चहा व्यवसायिकांबद्दल जाणून घेऊ.
आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं ठरवलं तर अशक्य असं काहीच नाही. प्रफुल्ल बिलोरे यांना एमबीए करून बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करायची होती. बिलोर मात्र चहा विकण्याचा व्यवसाय करतात आणि त्यांच्या कंपनीचे नाव MBA चायवाला आहे. २०१७ मध्ये त्यांनी याची सुरुवात केली आणि २०१९-२० या आर्थिक वर्षात ३ कोटी रुपयांची उलाढाल केली. प्रफुल्ल सध्या अहमदाबादमध्ये राहतो आणि 'एमबीए चायवाला' म्हणून देशभरात प्रसिद्ध आहे. बिझनेस इनसाइडरच्या अहवालानुसार, त्याने भोपाळ, श्रीनगर, सुरत आणि दिल्लीसह १ ०० हून अधिक शहरांमध्ये आपला व्यवसाय विस्तारित केला आहे आणि आता वर्षाच्या अखेरीस आणखी १०० ठिकाणी फ्रेंचायझी उघडणार आहेत. किमान ५०० लोकांना रोजगार निर्माण करण्याची योजना आहे.
अमुलीक सिंग बिजराल यांनी २०१० मध्ये स्थापन केलेला, चाय पॉइंट माउंटन ट्रेल फूड प्रायव्हेट लिमिटेडचा भाग आहे. भारतातील पहिला चहा स्टार्टअप जो दररोज ३,00,000 कप पेक्षा जास्त विकण्याचा दावा करतो. या कंपनीचे देशभरात १०० हून अधिक आउटलेट आहेत. अमुलेक सिंग बिजराल यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीएचे शिक्षण घेतले आहे. अमुलेकची उलाढाल आर्थिक वर्ष २०१८ मध्ये ८८ कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष २०२० मध्ये १९० कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे.
चायोस सकाळच्या निरोगी नाश्त्यासोबत गरम चहा देतात. नितीन सलुजा आणि राघव वर्मा या दोन आयआयटीयनांनी स्थापन केलेल्या, चायोस ची निर्मिती २०१२ मध्ये ग्राहकांना चहा देण्याच्या उद्देशाने करण्यात आली. कंपनीने आपले पहिले आउटलेट सायबर सिटी गुडगावमध्ये उघडले. आता दोघेही ६ शहरांमध्ये १९० स्टोअर्स चालवत आहेत आणि १०० स्टोअर्स त्यांनी जोडले आहेत. यामध्ये विविध चवीचा चहा आणि चटक मटक हटक्या रेसिपीचे पदार्थ खिलवण्यात येतात त्यामुळे लोकांचा ओघ त्यांच्याकडे कायम आहे. स्टॅटिस्टाच्या मते, चायोसचा आर्थिक वर्ष 2020 मध्ये महसूल सुमारे 1,000 कोटी रुपये होता.
अनुभव दुबेने आधी CA आणि नंतर UPSC मध्ये प्रयत्न केला पण अपयशी ठरला. मग त्याने उद्योजक होण्याचे ठरवले. २०१६ मध्ये, दुबेने मित्र आनंद नायक आणि राहुल पाटीदार यांच्यासह इंदूरमधील मुलींच्या वसतिगृहात 'चाय सुत्ता बार' ही चहा-कॅफे चेन उघडली. त्यांनी कुल्लडमध्ये इको-फ्रेंडली पद्धतीने चहा देण्यास सुरुवात केली आणि हळूहळू इतर फ्लेवर्स जसे की आले चहा, चॉकलेट चहा, मसाला चहा, वेलची चहा, त्याच्या मेनूमध्ये तुळशीचा चहा, केशर चहा इ. चवींची भर पडली. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या, या तिघांनी शोधून काढले की चहा हे पाण्यानंतर जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे पेय आहे आणि भारतीय रस्त्यावर फिरल्यानंतर, चहाची मागणी सर्वत्र आहे हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी चहा-कॅफे चेन सुरू करण्याचा निर्णय घेतला. आणि तो यशस्वी झाला.