Virat Kohli And Anushka Sharma At Bageshwar Dham: विराट अन् अनुष्का बागेश्वर धाममध्ये नतमस्तक? धीरेंद्र शास्त्रींना भेटले? व्हिडिओ व्हायरल By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 02:28 PM 2023-03-21T14:28:16+5:30 2023-03-21T14:35:17+5:30
Virat Kohli And Anushka Sharma At Bageshwar Dham: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी बागेश्वर धाम येथे जाऊन धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या दरबारात अर्ज दिल्याचा व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे सांगितले जात आहे. जाणून घ्या, सत्य... Virat Kohli And Anushka Sharma At Bageshwar Dham: आताच्या घडीला बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री चांगलेच चर्चेत आहेत. अलीकडेच मुंबईजवळील मीरा रोड येथे बागेश्वर बाबांचा दरबार आयोजित करण्यात आला होता. लाखो भाविक या दरबारासाठी उपस्थित होते, असे सांगितले जात आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या मुंबई दौऱ्याला मोठ्या प्रमाणात विरोधही करण्यात आला होता.
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे श्याम मानव यांनी पुन्हा एकदा बागेश्वर बाबांना खुले आव्हान दिले. यावर तुम्ही दरबारात या मग पाहू, असे प्रत्युत्तर बागेश्वर बाबांनी दिले. यानंतर आता भारतीय संघातील स्टार फलंदाज, रनमशीन म्हणून ख्याती असणारा विराट कोहली आणि त्याची पत्नी बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा बागेश्वर धाम येथील दरबारात गेल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याचे म्हटले जात आहे.
वास्तविक पाहता, अनेक बडे नेते आणि दिग्गज बागेश्वर धामच्या दरबारात उपस्थित राहिले आहेत. पण बागेश्वर धाममध्ये पोहोचल्यानंतर अर्ज केलेल्या चेहऱ्यांमध्ये विराट कोहलीचाही समावेश आहे का? धीरेंद्र शास्त्रींनी खरंच विराट कोहलीचे नाव काढले आहे का? या मागचे सत्य जाणून घेऊया....
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा बागेश्वर धाममध्ये बसलेले दिसत आहेत. युट्युबवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये दोघे एकत्र पूजा करताना दिसत आहेत. हे चित्र पाहून असे वाटते की, दोघेही मंदिरात बसून पूजा करत आहेत. व्हिडिओमध्ये असाही दावा केला जात आहे की, विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्याशी तासभर बोलून स्वत:साठी वरदान मागितले.
हा व्हिडिओ कितपत सत्य आहे, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हा व्हिडिओ बरोबर आहे. त्यात दिसणारे विराट आणि अनुष्का पूजा करत आहेत. पण प्रार्थना स्थळ बागेश्वर धामचे दरबार नाही. विराट आणि अनुष्का बागेश्वर धाम दरबार येथे बसून पूजा करत असल्याचा हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे.
हा व्हिडिओ महाकाल मंदिराचा आहे जिथे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा अलीकडेच दर्शनासाठी गेले होते. या दोघांनीही येथे पूजा-अर्चा केली होती.
विराट आणि अनुष्काचा महाकाल मंदिराचा भेट दिल्याचा व्हिडिओ एडिट करुन ते बागेश्वर धाम असे चुकीचे वर्णन करण्यात आले आहे. जेव्हापासून धीरेंद्र शास्त्री प्रसिद्धीझोतात आले आहेत, तेव्हापासून अशा व्हिडिओजची मोठी रांग लागली आहे. ज्यामध्ये खोटे आणि चुकीची माहिती दिली जात आहे. यूट्यूबवर अशा प्रकारची बरीच सामग्री आहे.
दरम्यान, मुंबईतील दरबारानंतर, कोणीही अंधश्रद्धेला बळी पडू नये. परंतु आपल्याला कोणालाही पुरावे देण्याची गरज नाही. ज्यांना आपल्यापासून समस्या आहे, त्यांनी येऊन पुरावा घ्यावा. ज्यांना गरज आहे, त्यांनी यावं आम्ही मलम लावू, पॅरासिटॅमॉलची गोळी देऊ, असा खोचक टोला धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी विरोधकांना लगावला आहे.
त्यांनी पहिले माझ्या भक्तांचा सामना करावा. संपूर्ण भारत आमचा आहे. आम्ही लोकांना शिक्षित करून सनातनशी जोडूनच राहू. भारतातील मंत्र आणि भारतातील ऋषि मुनींमध्ये किती ताकद आहे, हे आम्ही त्यांना सांगू, असेही बागेश्वर बाबा म्हणाले.
जर आपला कोणी विरोध करत असेल, तर तुम्ही मन दुखावून घेऊ नका. प्रभू श्रीराम होते तर रावणाच्या कुटुंबातील लोकही होते. आपण महाराष्ट्रात येऊ नये म्हणून खूप प्रयत्न केले गेले. परंतु आता आपण पुन्हा मुंबईत येऊ आणि जोपर्यंत जीवंत आहोत तोपर्यंत येत राहू, असेही धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी स्पष्ट केले.
ज्यांनी आम्हाला विरोध केला त्यांचेही धन्यवाद. जर तुम्ही आम्हाला मुंबईत थांबवू इच्छित आहात, तर एक आठवडा नक्की देऊ, परंतु धर्माला विरोध करणाऱ्याची सुट्टी करून. भारत हिंदू राष्ट्र नक्कीच बनेल, असा विश्वासही बागेश्वर धाम सरकारने व्यक्त केला.
आपल्याला विरोध करणाऱ्यांनी येऊन अर्ज करावा. आपण प्रत्येक गोष्टी सांगू. ज्याला आपल्यात ढोंगीपणा दिसतो त्यानं आपल्यासमोर यावे. ‘दूध का दूध पानी का पानी’ होईल. आपण स्वत:साठी बोलत नसून येणाऱ्या पिढीसाठी बोलत आहेत. जेणेकरून कोणीही मंदिरावर दगडफेकही करू शकणार नाही, असे धीरेंद्र शास्त्री म्हणाले. दरम्यान, यावेळी ठाण्यात बागेश्वर धाम मंदिर उभारले जाणार असल्याचे ते म्हणाले.