गजबच झालं! ठगांनी थेट खोटी बँकच सुरू केली, लाखो रुपये घेऊन लोकांना नोकरीही दिली, मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 03:19 PM2024-10-04T15:19:45+5:302024-10-04T15:27:29+5:30

छत्तीसगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, येथील एका गावात चक्क एसबीआयची डुप्लीकेट शाखा सुरू केली आहे.

आपण अनेक ठिकाणी फसवणुकीच्या घटना पाहिल्या आहेत. तर अनेक ठिकाणी चोरीच्याही घटना पाहिल्या असतील. छत्तीसगडमधील सक्ती जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तुम्ही बनावच पैसे, बनावट कागदपत्र बघितले असतील पण या ठिकाणी ठगांनी चक्क एसबीआयची एक बोगस शाखाच सुरू केली आहे. या घटनेमुळे छत्तीसगडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फसवणूक करणाऱ्यांनी एसबीआयची बनावट शाखा सुरू केली. यासोबतच अनेकांकडून लाखो रुपये घेऊन बनावट नियुक्तीपत्रे दिली.

या संपूर्ण प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी फरार आहेत. कोरबा व कावर्धा येथील अनेकांची लाखोंची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

मनोज अग्रवाल नावाची व्यक्ती कियोस्क शाखा उघडण्यासाठी अर्ज करण्यासाठी आली तेव्हा ही घटना उघडकीस आली. छापोरा गावात एसबीआयची शाखा पाहिल्यावर त्यांना याचा संशय आला. यानंतर त्यांनी या प्रकरणाचा तपास केला. यात ही शाखा खरी नसून बनावट असल्याचे उघड झाले. यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला.

या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीत बनावट बँकेच्या शाखेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बनावट नियुक्तीपत्रे देऊन प्रशिक्षणाच्या नावाखाली येथे बसविण्यात आल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांनी येथे छापा टाकला असता, कथित बँक व्यवस्थापक फरार झाला. तपासादरम्यान बँकेशी संबंधित कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाहीत. पोलिसांनी संगणक प्रणाली आणि हार्डडिस्क जप्त केली आहे.

एसडीओपी मनीष कुमार ध्रुव यांनी दिलेली माहिती अशी, या प्रकरणात रायपूर क्षेत्र व्यवस्थापकाचे बनावट सील आणि कागदपत्रे सापडली आहेत. पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

या बनावट बँकेच्या शाखेच्या माध्यमातून लाखो रुपये घेऊन अनेकांना नोकऱ्या दिल्या होत्या. संगीता कव्हर या महिलेची २.५० लाख रुपयांची, लक्ष्मी यादवची २ लाख रुपयांची, पिंटू मारावीची ५.८० लाख रुपयांची आणि परमेश्वर राठोड यांची ३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या सर्व लोकांना प्रशिक्षणाच्या नावाखाली बनावट नियुक्तीपत्र देऊन फसवणूक करण्यात आली.