सोशल मीडियात ट्रेंड करणारे 'पंखेवाले बाबा' लड्डू मुत्या स्वामी नेमके कोण आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 08:49 AM2024-09-30T08:49:21+5:302024-09-30T09:01:57+5:30

सोशल मीडियात एका रात्रीत स्टार झालेले अनेक रिलस्टार आपण पाहिले असतील. सध्याच्या काळात बरेच जण सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्यात रेल्वे असो बस असो अथवा कुठल्याही ठिकाणी गेले तरी लोक मोबाईलवर तासन्तास रिल्स बघत असतात.

याच रिलमध्ये सध्या एक व्हिडिओ प्रचंड ट्रेंड करत आहेत. तुम्हीदेखील हा व्हिडिओ पाहिला असेल. लड्डू मुत्या स्वामी असं या बाबाचं नाव आहे. यांचे भरपूर व्हिडिओ आणि त्या व्हिडिओवर होणारं ट्रोलिंगही तुम्ही बघितले असेल. पण लड्डू मुत्या स्वामी आहे कोण, कुठे राहतात आणि ते व्हायरल का झालेत हे जाणून घेऊया.

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या या व्हिडिओत हे कथित बाबा खुर्चीत बसलेले असतात आणि त्यांना काहीजण खांद्यावर उचलून घेतात. त्यानंतर हे बाबा डोक्यावरील पंखा जो फिरत असतो तो आपल्या हाताने थांबवतात आणि त्यानंतर त्याच हाताने लोकांच्या माथ्यावर ठेवून आशीर्वाद देतात.

हा व्हिडिओ सुरू असताना या बाबाची महती सांगणारा एक ऑडिओ गाणे लावले आहे. हा ऑडिओ वापरून अनेक रिलस्टार या बाबाची नक्कल करत व्हिडिओ पोस्ट करत आहेत. सोशल मीडियात या व्हिडिओ आणि ऑडिओने बराच धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे हा विषय चर्चेत आला.

कोण आहे लड्डू मुत्या स्वामी - कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील लड्डू मुत्या स्वामी हे त्यांच्या भागात प्रसिद्ध होते मात्र एका व्हिडिओने ते देशभरात चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही वाढली आहे.

पंखेवाले बाबा म्हणून लोकांना आशीर्वाद देणारे लड्डू मुत्या स्वामी हे नेटिझन्सच्या निशाण्यावर आले. चालू पंखा थांबवण्याच्या या प्रकाराची अनेकजण खिल्ली उडवत त्यांना ट्रोल करत आहेत. हे बाबा नेमके कोण, त्यांचे इतर व्हिडिओही लोक पाहू लागलेत.

लड्डू मुत्या स्वामी नावाचे हे बाबा प्रवचनकार आहेत. लोकांनी समाजात चांगले काम केले पाहिजे यामुळे आपले जीवन सार्थक होते. जर प्रत्येकजण आनंदी राहिला तर आयुष्य सुंदर होईल. आयुष्यात कुठल्याही कठीण प्रसंगाला आत्मविश्वासाने सामोरे गेले पाहिजे असं ते भक्तांना त्यांच्या प्रवचनातून सांगत असतात.

लड्डू मुत्या स्वामी नावाचे हे बाबा कर्नाटकातील बागलकोट भागात प्रवचन देण्याचं काम करतात. त्यांच्या प्रवचनाला लोकांची गर्दी जमते. बाबा चालता फॅन आपल्या हाताने थांबवून भक्तांना आशीर्वाद देतात. त्यांच्या या प्रकाराची अनेकांनी नक्कलही केली आहे.

लड्डू मुत्या बाबा यांच्या दर्शनासाठी लोकांची रांग लागते. ते चालता फॅन कसे थांबवतात हा चमत्कारिक कारनामा पाहायला भाविक बाबांना भेटतात. बाबांच्या चाहत्याने त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट केला आणि तो देशभरात चर्चेचा विषय बनला.

याआधीही असेच व्हिडिओ व्हायरल झाले होते, मागील वर्षी धीरेंद्र शास्त्री यांचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले. समोरच्या मनात काय आहे हे ते चिठ्ठीवर लिहून सांगत असल्याचा दावा करण्यात येत होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून ते प्रसिद्धीझोतात आले होते.