5G Data Price: कोणत्या शहरांमध्ये पहिले मिळणार 5G सेवा?; किती असेल किंमत, मंत्र्यांनी केलं स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 08:25 PM2022-06-21T20:25:42+5:302022-06-21T20:31:13+5:30

5G स्पेक्ट्रमचा लिलाव लवकरच होणार आहे. लॉन्चच्या अगोदर, 5G डेटाच्या किंमती आणि उपलब्धतेबद्दल मोठी माहिती आली आहे.

5G स्पेक्ट्रम लिलावाची तयारी सुरू झाली आहे. या वर्षी जुलैअखेर लिलाव प्रक्रिया सुरू केली जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. स्पेक्ट्रम लिलावात दूरसंचार कंपन्यांना पुढील 20 वर्षांसाठी 5G स्पेक्ट्रम मिळणार आहे. यामुळे दूरसंचार कंपन्या 5G सेवा सुरू करू शकतील.

माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार 5G नेटवर्कची सुरूवात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये केली जाणील. तसंच यावर्षाच्या म्हणजेत 2022 च्या अखेरिस 20-25 शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली जाणार आहे.

रिपोर्ट्सनुसार, 18 जून रोजी झालेल्या समिटमध्ये अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, भारतातील 5G ​​डेटाची किंमत जगातील इतर देशांपेक्षा कमी असेल. पुढील महिन्यात लिलाव प्रक्रिया सुरू होणार असली, तरी त्याची बॅकग्राऊंड प्रोसेस आधीच सुरू होती.

केंद्रीय मंत्र्यांनी पुष्टी केली आहे की या वर्षाच्या अखेरीस देशातील 20 ते 25 शहरांमध्ये 5G सेवा लाइव्ह होईल. तथापि, सरकारच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 5G रोलआउटच्या पहिल्या टप्प्यासाठी 13 शहरांची नावे देण्यात आली आहेत.

देशात प्रथम 5G सेवा बेंगळुरू, दिल्ली, हैदराबाद, लखनौ, पुणे, चेन्नई, गांधीनगर, जामनगर, मुंबई, अहमदाबाद आणि चंदीगड येथे उपलब्ध होईल.

पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, अश्विनी वैष्णव सांगितले की भारतात इंटरनेटचा सरासरी दर $2 (सुमारे 155 रुपये) आहे, तर जागतिक सरासरी दर $25 (सुमारे 1,900 रुपये) आहे. ते म्हणाले की 5G ची किंमत देखील याच्याच जवळपास असेल.

यापूर्वी एअरटेलचे सीटीओ रणदीप सेखोन यांनीही असाच दावा केला होता. भारतात 5G सेवेची किंमत 4G पेक्षा जास्त असणार नाही, असे ते म्हणाले होते. 5G स्पेक्ट्रमच्या लिलावानंतरच आम्ही सेवेची अंतिम किंमत सांगू शकू, असे सेखोन म्हणाले होते.

ज्या ठिकाणी 5G सेवा उपलब्ध आहेत, त्या ठिताणी 5G सेवेसाठी 4G च्या तुलनेत अधिक प्रीमिअम किंमत द्यावी लागणार नाही. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की जगभरात एव्हरेज डेटा कंजम्शन 11GB आहे. तर भारतात हेच डेटा कजम्शन 18GB आहे.