5G Expense: 5G येताच एकरकमी 15 हजारांचा खर्च करावा लागणार; समोर आली महत्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 04:18 PM2022-08-17T16:18:34+5:302022-08-17T16:25:06+5:30

5G on Pocket: देशात आता काऊंटडाऊन सुरु झाले आहे. येत्या काहीच दिवसांत तीनपैकी एकतरी कंपनी देशात महत्वाच्या शहरांत फाईव्ह जी सेवा सुरु करणार आहे.

देशात आता काऊंटडाऊन सुरु झाले आहे. येत्या काहीच दिवसांत तीनपैकी एकतरी कंपनी देशात महत्वाच्या शहरांत फाईव्ह जी सेवा सुरु करणार आहे. आता प्रश्न उरतो तो, तुम्हाला फाईव्ह जी सेवा कशी वापरता येणार. कारण ही सेवा वापरण्यासाठी तुम्हाला सध्याचा फोरजी फोन बदलून नवा फाईव्ह जी फोन घ्यावा लागणार आहे.

बाजारात १० हजार रुपयांपासून फाईव्ह जी रेडी फोन मिळत आहेत. परंतू, ते सगळ्याच ठिकाणी चालतील असे कोणतीच कंपनी ठोस सांगू शकत नाही. कारण प्रत्येक कंपनीने वेगवेगळे स्पेक्ट्रम आणि बँडविड्थ विकत घेतल्या आहेत. ग्रामीण भागात, निमशहरी आणि महानगरांमध्ये या वेगवेगळ्या स्पेक्ट्रमवर कंपन्या फाईव्ह जी सेवा देणार आहेत. यामुळे किती बँडचा मोबाईल घ्यावा, यावर सारे गणित ठरणार आहे.

साधारण दोन बँडचा मोबाईल १०-१२ हजारापासून मिळतो. पाच बँडचा मोबाईल १७-१८ आणि सात बँडचा मोबाईल २२-२५ हजाराला मिळतो. बाजारात सध्या १३ बँडपर्यंत मोबाईल उपलब्ध आहेत. तशी किंमतही वाढत जाते. दुसरी गोष्ट म्हणजे फाईव्ह जीसाठी वेगळे सिम येईल की फोरजीच्या सिमवरच सेवा मिळेल हे देखील चर्चेतच आहे. परदेशांत दोन्ही सिमवर सेवा मिळत आहे. परंतू ५जी सिमवरील हाय फ्रिक्वेन्सी बँड असल्याने त्यासाठीचा खर्चदेखील जास्त आहे. यामुळे कंपन्या शहरांत ५जी सिम आणि ग्रामीण भागात ४जी सिमवर सेवा देऊ शकतात.

या साऱ्यामध्ये एक गोष्ट मात्र नक्की आहे, की तुम्हाला ५जी फोन घ्यावा लागणार आहे. कारण 4G Smartphone वर तुम्हाला फाईव्ह जी वापरता येणार नाहीय. यामुळे थोडे थांबून दुसऱ्यास ठेच मागचा शहाणा याप्रमाणे तुम्हाला नवीन 5G Network चा फोन घ्यावा लागणार आहे. सरासरी किंमत १५ हजार रुपये आहे. एका सर्व्हेनुसार भारतात ११५ कोटी मोबाईल सबस्क्रायबर्स आहेत. त्यापैकी ९८ टक्के लोक हे सध्या 4G नेटवर्क वापरत आहेत.

६ एप्रिलला भारत सरकारनेच ही आकडेवारी प्रसिद्ध केली होती. यामुळे ज्या लोकांनी नजिकच्या काळात ५जी फोन घेतला असेल त्यांना जर ५जी नेटवर्क मिळाले नाही तर आणि ज्यांच्याकडे ४जी फोन आहेत, त्यांना नवीन फोन घ्यावा लागणार आहे. म्हणजेच जर ५जी सिम आले तर तुम्हाला फक्त सिम बदलून चालणार नाही तर स्मार्टफोनही नवा घ्यावा लागणार आहे. एकंदरीतच ५जी क्रांती घेऊन येणार आहे, असे जरी म्हटले जात असले तरी तो खिसा रिकामा करणाराच सौदा ठरणार आहे.

सरकारच्या म्हणण्यानुसार, देशात टेलिकॉम बेस स्टेशन्सही वेगाने वाढू लागली आहेत. 2014 मध्ये त्यांची संख्या 6,49,834 एवढी होती, ती आता 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत 23,25,948 पर्यंत वाढली आहे. ११५ कोटी लोकांचा आकडा हा ३१ डिसेंबर २०२१ पर्यंतचा आहे. मोबाईल निर्माता कंपन्यांनी दीड वर्षांपासून 5G स्मार्टफोनवर भर देण्यास सुरुवात केली होती, परंतु भारतात ही संख्या अजूनही खूपच कमी आहे.