सेलिब्रिटींमध्ये मोबाइल चॅट्सची भीती? फोनचा डेटा कायमचा डिलीट करण्यासाठी २ लाख घेताहेत एक्स्पर्ट! By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 01:34 PM 2021-11-03T13:34:25+5:30 2021-11-03T13:44:35+5:30
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती ड्रग्ज प्रकरणात अडकल्यानंतर व्हॉट्सअॅप चॅट्सनं मोठे खुलासे झाले होते. त्यामुळे आता सेलिब्रिटींमध्ये व्हॉट्सअॅप चॅट्स लीक होत असल्यानं भीतीचं वातावरण आहे. यातच आता नवी माहिती समोर आली आहे. जाणून घ्या... हायप्रोफाइल बॉलीवूड प्रकरणांमध्ये व्हॉट्सअॅप चॅट लीक झाल्यानंतर बॉलीवूडकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे आता भारतातील अनेक मोबाइल कम्युनिटीचे लोक आता डिव्हाइस-क्लीनअप सेवा देणाऱ्या तज्ज्ञांची नियुक्ती करू लागले आहेत.
एनसीबीचं पथक आता तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं हायटेक झाल्याचं आता सर्वांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे मोबाइल चॅट्स असोत किंवा मग हार्डडीस्क यातील डिलीट केलेली माहिती देखील पूर्ववत करण्यात अधिकाऱ्यांना यश येत आहे.
त्यामुळे हायप्रोफाइल प्रकरणांमध्ये आता मोबाइल फोन, हार्ड डिस्क आणि लॅपटॉपमधील डेटा कायमस्वरुपी डिलीट करणाऱ्या एक्स्पर्टना चांगली मागणी वाढली आहे. अनेक खासगी डिजिटल लॅब्सनं डेटा कायमस्वरुपी डेटा डिलीट करण्याची सेवा देण्यास सुरुवात केली आहे.
एका हिंदी वृत्तवाहिनीनं याबाबत सविस्तर माहिती घेत एक रिपोर्ट केला आहे. यात मुंबईतील अनेक हायटेक कंपन्या मोबाइल, लॅपटॉप आणि हार्डडिस्कमधील माहिती कायमस्वरुपी नष्ट करण्याची सेवा देत आहेत. कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही नाव जाहीर न करण्याच्या अटीवर या गोष्टी मान्य केल्या आहेत.
मोबाइल फोन, हार्ड ड्राइव्ह आणि रिमोट बॅकअपला फॉरेन्सिक पद्धतीनं कायमस्वरुपी नष्ट करण्यासाठी ग्राहकांकडून मागणी केली जात आहे. यात ठराविक मेसेज किंवा डेटा कायमस्वरुपी डिलीट करण्यासाठीचे ग्राहक संपर्क साधत असल्याचं टेक कंपन्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं आहे.
एका आघाडीच्या खासगी फॉरेन्सिंक एक्स्पर्टनं केलेल्या खुलाशानुसार त्यांच्या कंपनीनं याआधी तपासअधिकाऱ्यांसोबत काम केलं आहे. आता ते ग्राहकांनाही क्लीनअप सेवा देत आहेत. यात फिल्म इंडस्ट्रीशी निगडीत लोकांचा समावेश आहे. त्यांच्या लॅबमध्ये एका मोबाइल फोनमधील ठराविक डेटा कायमस्वरुपी नष्ट करण्यासाठी जवळपास २ लाख रुपये आकारले जात आहेत.
"एखादा ग्राहक आमच्याकडे मोबाइल डेटा किंवा हार्ड ड्राइव्ह डेटा कायमस्वरुपी नष्ट करण्यासाठी आला की आम्ही संपूर्ण डिव्हाइसची तज्ज्ञांकडून तपासणी करुन घेतो. त्यानंतर डिलीट केलेला डेटा रिकव्हर होतो आहे का याचीही अत्याधुनिक तंत्रज्ञानानं चाचणी करतो. ती एका प्रकारची सिस्टम प्रोसेस आहे", असं एका फॉरेन्सिंग एक्स्पर्टनं सांगितलं.
"आम्ही याबाबतीत अतिशय दाव्यानं सांगतो की एकदा डिलीट केलेला डेटा पुन्हा रिकव्हर केला जाऊ शकत नाही अशी सेवा दिली जाते. आम्ही फिल्मी इंडस्ट्रीसाठी देखील काम केलं आहे. पण ग्राहकांची नावं आम्ही सांगू शकत नाही. डिलीट झालेली माहिती पुन्हा रिकव्हर होऊच शकत नाही. या प्रोसेसला आम्ही Wiping म्हणतो", असं तो फॉरेन्सिक एक्स्पर्ट म्हणाला.
मुंबईतील आणखी एका खासगी लॅब एक्स्पर्टनं दिलेल्या माहितीनुसार तेही अशाच पद्धतीनं लोकांच्या फोनमधील माहिती कायमस्वरुपी डिलीट करण्याची सेवा देत आहेत. ज्यांच्यावर कोर्ट प्रकरणं सुरू आहेत असे लोक त्यांचे ग्राहक आहेत आणि एक फोन क्लीन करण्यासाठी १२ हजार रुपये आकारले जातात. याशिवाय अॅप्लिकेशनची माहिती नष्ट करण्यासाठी प्रत्येक एका अॅपमागे ६ हजार रुपये आकारले जात आहेत.
"आमच्याकडे अशापद्धतीचे ग्राहक येत आहेत की ज्यांचा कोर्ट खटला सुरू आहे आणि त्यांना आपला फोन क्लीनअप करायचा आहे. जेणेकरुन डेटा रिकव्हर केला जाऊ नये अशी त्यांची मागणी असते. आम्ही अशापद्धतीनं मोबाइलमधील माहिती नष्ट करतो की जी कधीच रिकव्हर केली जाऊ शकत नाही", असं मोबाइल एक्स्पर्ट म्हणाला.