भारतात विकले गेलेत तब्बल 1 कोटी 5G स्मार्टफोन; पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 10:01 AM2022-03-19T10:01:45+5:302022-03-19T10:04:45+5:30

५ जी तंत्रज्ञानाची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. ५जी चालण्याची सुविधा असलेले तब्बल १ कोटी स्मार्टफोन भारतात विकले गेले आहेत. मात्र, ५जी तंत्रज्ञान सेवा देशात सुरू होण्यास अजून मोठी प्रतीक्षा करावी लागेल, असे चित्र सध्यातरी दिसून येत आहे.

५ जी सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या स्पेक्ट्रम लिलावही अद्याप सरकारने केलेला नाही. याचाच अर्थ लोकांनी खरेदी केलेल्या ५जी हँडसेट्सचा प्रत्यक्ष वापर कधी होईल, हे सांगणे कठीण आहे. सूत्रांनी सांगितले की, लिलाव तर फारच दूरची गोष्ट आहे, अद्याप स्पेक्ट्रमची राखीव किंमतही सरकार निश्चित करू शकलेले नाही.

ग्राहकांप्रमाणेच दूरसंचार कंपन्यांनाही ५ जी तंत्रज्ञानाची प्रतीक्षा आहे. लोकांत ५जीबाबत असलेली उत्सुकता पाहता, या सेवेला मोठ्या संख्येने ग्राहक मिळतील तसेच व्यवसाय वाढेल, अशी कंपन्यांची अपेक्षा आहे.

५ जी तंत्रज्ञानामुळे क्रांतिकारक बदल होतील.सरकारी सेवांपासून खाजगी कंपन्यांपर्यंत तसेच आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नव्या संधी निर्माण होतील. तथापि, या सर्व अपेक्षांना सरकारच्या सुस्त चालीमुळे खीळ बसली आहे.

४ जीच्या तुलनेत ५जीची डेटा हस्तांतरण गती प्रचंड अधिक असेल. त्यामुळे फायली झटपट डाऊनलोड व अपलोड होतील. भविष्यातील अनेक नव्या तंत्रज्ञानाचा लाभ ५जीमुळे ग्राहकांना घेता येईल. भविष्यकालीन जटील उपकरणांचा वापर सहजपणे करता यावा, यासाठीच ५जीचा विकास करण्यात आला आहे.