पाणी पडले तरी डिस्प्ले वापरता येतो? तीन गोष्टी वेगळ्या, सर्वात स्वस्त स्मार्टफोनपैकी एक Poco c71, कसा आहे...?
By हेमंत बावकर | Updated: April 9, 2025 18:21 IST2025-04-09T18:10:23+5:302025-04-09T18:21:39+5:30
Poco C71 Review in Marathi: साधारण साडे सहा ते सात हजारांच्या किंमतीत हा फोन उपलब्ध आहे. एवढ्या कमी किंमतीच्या मोबाईलमध्ये असे फार काय असेल असेही तुम्हा-आम्हाला वाटू शकेल. परंतू, एवढ्या कमी किंमतीत कंपनीने एक गोष्ट वेगळी जरूर देण्याचा प्रयत्न केला आहे.

हेमंत बावकर
बजेटमधील स्मार्टफोनच्या स्पर्धेत आणखी एका स्मार्टफोनची एन्ट्री झाली आहे. शाओमीची उपकंपनी असलेल्या पोकोचा c71 आला आहे. साधारण साडे सहा ते सात हजारांच्या किंमतीत हा फोन उपलब्ध आहे. एवढ्या कमी किंमतीच्या मोबाईलमध्ये असे फार काय असेल असेही तुम्हा-आम्हाला वाटू शकेल. परंतू, एवढ्या कमी किंमतीत कंपनीने एक गोष्ट वेगळी जरूर देण्याचा प्रयत्न केला आहे. चला पाहुया पोकोचा हा स्मार्टफोन कसा आहे...
आमच्याकडे रिव्ह्यूसाठी आलेले Poco c71 चे ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजचे व्हेरिअंट होते. स्टोरेज कमी असले तरी तुम्ही २ टेराबाईट एवढी मोठी स्टोरेजचे मेमरी कार्ड वापरू शकता. यासाठी आम्हाला जुने मेमरी कार्ड कपाटातून शोधावे लागले खरे. आणखी एक महत्वाचे म्हणजे हा ४जी फोन आहे. एकंदरीत घरातील वृद्ध किंवा मोठ्या व्यक्ती असतील ज्यांचा वापर फक्त फोन जाणे-करणे एवढाच असेल, सामान्य कामगार किंवा एक सेकंडरी फोन म्हणून हा फोन उपयुक्त ठरू शकतो.
आता कंपनीने हा फोन का आणला असेल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या फोनसारखेच सॅमसंग सारख्या कंपनीचेही फोन बाजारात उपलब्ध आहेत. म्हणजे या फोनला मोठा खरेदीवर्ग असणारच आहे. या फोनसोबत 15W चा चार्जर देण्यात आला आहे. जो दीड तासात बॅटरी चार्ज करतो. 5200 mAh ची बॅटरी सर्फिंग, व्हिडीओ आणि इतर गोष्टींसाठी दिवस, दीड दिवस आरामात चालते.
पाठीमागे 32MP कॅमेरा देण्यात आला आहे. जो बजेटच्या मानाने फोटो क्लिक करतो. सेल्फीला ८ मेगापिक्सल कॅमेरा आहे, हा देखील ठीकच म्हणावा लागेल. कॅमेराकडून जास्त अपेक्षा करू शकत नाही. डिटेल्स फारसे मिळत नाहीत. अल्ट्रा एचडी मोड, पोर्ट्रेट मोड, नाईट मोड, टाइमलॅप्स असे मो़ड्स आहेत.
डिस्प्लेच्या बाबत एक गोष्ट नाही दोन गोष्टी आम्हाला आवडल्या, त्या म्हणजे १२० हर्ट्झचा रिफ्रेश रेट आणि दुसरी म्हणजे वेट टच. एवढा रिफ्रेश रेट महागड्या फोनमध्ये असतो. तो बजेट फोनमध्ये देण्यात आला आहे. ज्यामुळे तुम्हाला व्हिडीओ पाहणे, गेम खेळताना लॅग जाणवणार नाही.
वेट टच...
वेट टच म्हणजे तुम्ही पावसातून जात असाल किंवा पाण्याच्या ठिकाणी काम करत असाल, काम करता करता स्क्रीनला पाणी लागले तर स्क्रीन तुमच्या बोटांचा टच डिटेक्ट करणार आहे. बऱ्याचदा हात ओले असतात आणि फोन येतो, किंवा पावसात भिजायला जाता आणि फोटो काढायचे असतात तेव्हा तुम्हाला हात व स्क्रीन पुसावी लागते. तरच क्लिक करता येते. नाहीतर कुठेपण टच झाल्यासारखे वाटते आणि भलतीच अॅप ओपन होत बसतात. हे या फोनमध्ये टाळले गेले आहे. म्हणून आम्ही म्हटले की कामगार लोकांसाठी किंवा अशाप्रकारची कामे करणाऱ्यांसाठी हा फोन चांगला आहे. या फोनला पाण्यापासून संरक्षणासाठी आयपी ५२ रेटिंग आहे.
या फोनमध्ये आणखी एक वेगळी गोष्ट म्हणजे डोळ्यांना सुखावणारा डिस्प्ले आहे. म्हणजेच कमी प्रमाणावर ब्लू लाईट सोडणारा, जेणेकरून झोप आणि डोळ्यांना त्रास होणार नाही असा देण्यात आला आहे. याचबरोबर प्रकाशानुसार या ब्लू लाईट आपोआप कमी जास्त केल्या जातात. यामुळे तुम्हाला थोडा डिस्प्ले डल वाटू शकतो, परंतू डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगला असल्याचे टीयूव्ही सर्टिफिकेट याला मिळालेले आहे.
डिझाईन...
या स्मार्टफोनचे डिझाईन किंमत कमी असली तरी प्रिमिअम वाटणारे आहे. पाठीमागे गोल्डन लाईन असलेला कॅमेरा सेटअप, ७० टक्के मॅटसारखे फिनिश, उर्वरित चकचकीत. एक महत्वाचा बदल म्हणजे सर्व स्मार्टफोनना खालच्या बाजुला मुख्य स्पिकर असतो, इथे वरच्या बाजुला स्पीकर देण्यात आलेला आहे. खालच्या बाजुला टाईप सी पोर्ट, ३.५ mm जॅक आणि माईक एवढेच आहे. या स्पीकरचा आवाजही किंमतीच्या मानाने ठीक आहे.
एकंदरीतच बजेट कमी असलेल्या व्यक्तींसाठी, जिथे फाईव्ह जी नाही तिथे वापरासाठी म्हणजेच ग्रामीण भागात, किंवा पाण्याशी संबंधीत काम करणारे, ओल्या हातांनी फॅक्टरी वगैरेमध्ये काम करणारे या फोनचा विचार करू शकतात. ज्यांचे फोनवर व्हिडीओ पाहणे, वाचन करणे आदी जास्त आहेत ते देखील डोळ्यांच्या सुरक्षिततेसाठी या फोनचा वापर करू शकतात.