CE Certificate: इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील CE टॅगचं महत्व काय? खरेदी करताना जरुर तपासून पाहा, कारण... By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 08:32 AM 2022-06-01T08:32:13+5:30 2022-06-01T08:38:17+5:30
CE symbol on Electronic Products: जर तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उत्पादनावर 'CE' असा टॅग असतो. बहुतेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्याचा अर्थ जाणून घ्यायची देखील इच्छा नसते. पण आज आपण याची खास माहिती जाणून घेणार आहोत. CE symbol on Electronic Products: जेव्हा आपण एखादे इलेक्ट्रॉनिक उत्पादन खरेदी करतो तेव्हा त्याच्या पॅकिंगचा नक्कीच विचार करतो. तुम्ही जर कधी त्याचे पॅकिंग पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक उत्पादनावर वेगवेगळ्या प्रकारची माहिती लिहिलेली असते. पण जवळपास प्रत्येक उत्पादनावर 'CE' असा टॅग लिहिलेला असतो.
बहुतेक लोक त्याकडे एकंदर त्या माहितीकडे दुर्लक्ष करतात. पण त्यातील CE या टॅगला खूप महत्व आहे. तुमचा मोबाईल चार्जर असो किंवा लॅपटॉप चार्जर, त्या सर्वांवर CE टॅग असतो. वास्तविक हा एक विशेष टॅग आहे. याचा अर्थ काय ते जाणून घेऊया...
केव्हापासून झाली सुरुवात? युरोपियन देशांमध्ये १९८५ पासून सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या मागील बाजूस हे CE टॅद लागू केला गेला. पूर्वी हे चिन्ह CE ऐवजी EC असायचे. याचा अर्थ 'Conformite Europeenne.' असा होतो.
टॅगचा अर्थ काय? इलेक्ट्रॉनिक उत्पादनावर CE टॅग म्हणजे संबंधित उत्पादन तयार करणाऱ्या कंपनीने युरोपच्या मानकांची काळजी घेतली आहे. खरे तर युरोपमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवण्यासाठी काही मानके ठरवून दिली आहेत. जसे की इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी 'लो व्होल्टेजचे नियम, सुरक्षितता आणि पर्यावरणाचे संरक्षण'. CE टॅगची सर्व उत्पादनं बनवताना या गोष्टींची काळजी घेतली जाते.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील महत्व CE टॅगचा अर्थ असा आहे की कंपनी या टॅगसह आपले उत्पादन कायदेशीररित्या बाजारात विकू शकते आणि अशी उत्पादनं इतर देशांमध्ये निर्यात देखील केली जाऊ शकतात.
CE टॅग सूचित करतं की इलेक्ट्रॉनिक वस्तूचं उत्पादन मूळ कोणत्याही देशात झालेलं असलं तरी युरोपियन आर्थिक क्षेत्राच्या कोणत्याही भागात मुक्तपणे अशा वस्तूंचा व्यापार केला जाऊ शकतो.
युरोपियन युनियन, युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन (EFTA) आणि तुर्कीमध्ये इलेक्ट्रॉनिक उत्पादनाच्या विक्रीसाठी उत्पादनांवर CE टॅग असणे अनिवार्य आहे.
जेव्हा एखादी कंपनी आपल्या उत्पादनावर CE टॅग लावते तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की कंपनीनं उत्पादनावर लागू होणाऱ्या निर्देशांवरील सर्व आवश्यक आरोग्य आणि सुरक्षा आवश्यकतांचं पालन केलेलं आहे. उत्पादनाची एका प्रकारे हमी ग्राहकाला मिळते.