लहान मुलांना मोबाईल वापरण्यास बंदी; आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याने 'हा' देश घेणार निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 16:21 IST2024-12-06T16:13:21+5:302024-12-06T16:21:08+5:30

मोबाईलच्या अतिवापराचा आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेता एका देशात लवकरच महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे.

कधीकाळी फक्त एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी वापरण्यात येणारे उपकरण अशी ओळख असलेल्या मोबाईलचा होणारा अतिवापर हा सध्या चिंतेचा विषय ठरत आहे. मोबाईलच्या अतिवापराचा आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेता एका देशात लवकरच महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे.

स्मार्टफोनच्या वापराबाबत तज्ज्ञांच्या समितीने स्पेन सरकारला याबाबत सल्ला दिला आहे. समितीने डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करताना त्यांच्या स्क्रीन टाइमबद्दल विचारण्याचा सल्लाही दिला आहे.

मुलांच्या स्मार्टफोन वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पेन कायदा बनवण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी ५० सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती.

समितीने १३ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी डिजिटल उपकरणांच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

मुलांना ३ वर्षापर्यंत डिजिटल उपकरणे देऊ नयेत, अशी शिफारसही आहे.

६ वर्षापर्यंतच्या मुलांना हे उपकरण अगदी आवश्यक असेल तेव्हाच दिले पाहिजे.

६ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांना इंटरनेटशिवाय फोन वापरण्याची परवानगी द्यावी.

मुलांना मनोरंजनासाठी खेळ आणि मैदानी खेळ खेळण्याचा सल्लाही २५० पानी अहवालात देण्यात आला आहे.

तंबाखू, धूम्रपान आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे संदेश पॅकेटवर लिहिलेले असतात, तसेच संदेश आता स्मार्टफोनसाठीही आपल्या मोबाइलवर दिसणार आहेत. स्पेनमध्ये लवकरच असे इशारे देण्यात येणार आहेत.