Facebookनं तयार केलं स्वत:च 'सुप्रीम कोर्ट', वादग्रस्त पोस्टवर होणार निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 07:13 PM2020-05-07T19:13:59+5:302020-05-07T19:36:56+5:30

सोशल मीडिया कंपनी फेसबुकने एक स्वतंत्र बोर्डची घोषणा केली आहे. फेसबुकवरील कोणत्याही प्रकारची वादग्रस्त पोस्ट काढून टाकण्यासंबंधी निर्णय घेण्याचे काम या बोर्डाद्वारे केले जाणार आहे.

या बोर्डमध्ये डेन्मार्कचे माजी पंतप्रधानांचा समावेश आहे. याशिवाय, फेसबुकने तयार केलेल्या या कथित स्वतंत्र बोर्डात एक नोबेल पारितोषिक विजेता आणि काही कायदे तज्ज्ञही असणार आहेत.

सुरूवातीला फेसबुकच्या या बोर्डामध्ये 16 सदस्य असतील, त्यानंतर या सदस्यांची 40 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. हे बोर्ड फेसबुकवरून कोणत्या प्रकारच्या पोस्ट काढून टाकायच्या याबाबत निर्णय घेईल.

फेसबुकने तयार केलेल्या या स्वतंत्र बोर्डाला फेसबुकचे सुप्रीम कोर्ट म्हटले जात आहे. या सुप्रीम कोर्टात फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग सुद्धा फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवरून पोस्ट हटविण्याबाबतचा निर्णय बदलू शकणार नाहीत.

दरम्यान, फेसबुक कॉन्टेंट मॉडरेशनवरून गेल्या काही दिवसांपासून सवाल उपस्थित होत आहेत. या कारणास्तव, कंपनीने फेसबुकवरून ट्रेंडिंग सेक्शन हटविले होते. कारण, स्वतःच्या फायद्यासाठी ट्रेंडिंगमध्ये हेरफेर करण्यात येत असल्याचा कंपनीवर आरोप होता.

फेसबुकने म्हटले आहे की, या बोर्डामध्ये असलेल्या सदस्यांनी 27 देशांमध्ये वास्तव्य केले आहे आणि त्यांना 29 भाषा ज्ञात आहेत. या बोर्डाचे चार सह-अध्यक्ष अमेरिकेतील आहेत. याशिवाय, एक चतुर्थांश सदस्यही अमेरिकेतील आहेत.

फेसबुकने आपल्या एका ब्लॉगपोस्टमध्ये म्हटले आहे की हे बोर्ड कॉन्टेंट मॉडरेशनच्या एका नवीन मॉडेलचे रिप्रेजेंट करेल. फेसबुकच्या या बोर्डात विविध देशांतील पत्रकार, न्यायाधीश, डिजिटल माहिती अधिकार कार्यकर्ते आणि माजी सरकारी सल्लागार यांचा समावेश आहे.