BSNL च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; आता प्रत्येक युझरला मिळणार Super Fast Internet

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 03:20 PM2021-04-01T15:20:07+5:302021-04-01T15:29:41+5:30

लवकरच देशात 4G सेवा सुरू होण्याची शक्यता

सध्या सर्वच दूरसंचार कंपन्यांमध्ये आपले ग्राहक आपल्याकडेच ठेवण्यासाठी मोठी स्पर्धा सुरू आहे. प्रत्येक कंपन्या काही ना काही नव्या योजना सुरू करत आहेत.

सध्या सर्वच कंपन्या ४जी सेवा देत असल्या तरी सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल अद्यापही ३जी सेवाच देत आहे. अशा परिस्थितीत BSNL च्या ग्राहकांसाठी आता चांगली बातमी आहे.

सरकारी दूरसंचार कंपनी BSNL आता आपल्या ग्राहकांना चांगलं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. आता BSNL च्या ग्राहकांनाही वेगवान इंटरनेटचा फायदा घेता येणार आहे.

Telecomtalk ने दिलेल्या माहितीनुसार BSNL च्या ग्राहकांनाही आता वेगवान ४जी सेवा मिळणार आहे.

सरकारनं BSNL ला संपूर्ण देशात हायब्रिड ४जी सेवा सुरू करण्यास मान्यता दिली आहे. BSNL लवकर यासाठी निविदा काढणार आहे.

आंतरराष्ट्रीय वेंडर्स देशात ५७ हजार साईट्सना ४जी हायब्रिड इंटनेटसाठी अपग्रेड करतील.

समोर आलेल्या माहितीनुसार नोकिया आणि एरिक्सन या कंपन्या एकत्र मिळून BSNL चं ४ जी अपग्रेड प्लॅनसाठी अर्ज करू शकतात.

रिपोर्टनुसार BSNL या वर्षाच्या अखेरिस संपूर्ण देशात ४जी सेवा सुरू करू शकते.

यापूर्वी BSNL नं १ जानेवारी २०२१ रोजी आगामी 4G टेंडरमध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय कंपन्यांकडून प्रायर रजिस्ट्रेशन / प्रुफ ऑफ कॉन्सेप्टसाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट मागवले होते.

BSNL च्या रिव्हायवल प्लॅनसाठी केंद्र सरकारनं दोन वर्षांपूर्वीच मंजुरी दिली होती. याअंतर्गत, टेलिकॉम कंपनीला बजेट वाटपाच्या माध्यमातून 4G सेवांसाठी स्पेक्ट्रमच्या प्रशासकीय वाटपाचा समावेश आहे.