आपापसात गॉसिप करा, बॉसला सुद्धा या कानाची त्या कानाला खबर लागणार नाही; नोकरी करणाऱ्यांसाठी आले अॅप...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 15:08 IST2025-02-04T15:02:54+5:302025-02-04T15:08:41+5:30
आतापर्यंत या अॅपवर ८३ हजारांहून अधिक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची नोंदणी आहे. यावरून तुम्ही खूप काही करू शकता...

ऑफिसमध्ये एकामेकांबरोबर बोलणे, एकमेकांबद्दल बोलणे, इतरांबद्दल बोलणे आदी गोष्टी या कॉमन असतात. यावरून नंतर वादही होतात. मतभेदही होतात. कोणीतरी बॉसला चुगल्या करणाराही असतो किंवा त्या व्यक्तीलाही तुझ्याबद्दल असे बोलत होते, असे सांगणाराही असतो. म्हणतात ना भिंतीलाही कान असतात, तसेच. या धोक्यापासून सुटका करण्यासाठी बहुप्रतिक्षित असे ब्लाईंड (Blind app) भारतात लाँच झाले आहे.
ब्लाईंड हे एक असे अॅप आहे ज्यावर तुम्ही सहकारी कर्मचाऱ्यांशी बोलू शकणार आहात. याचबरोबर तुम्ही करिअरची महत्त्वाची माहिती जलद उपलब्ध करून देणे आणि सक्रिय सहभागाद्वारे तुमच्या समस्यांवर उपाय शोधणे हे देखील करू शकणार आहात.
या अॅपवर तुम्हाला तुमच्या ऑफिसच्या मेल आयडीद्वारे लॉगिन करावे लागते. तुम्ही तुमच्या नोकरीच्या संबंधी, तुमच्या क्षेत्रातील संधींच्या संबंधीची माहिती तिथे विचारू शकता. तुमच्या क्षेत्रातील लोक तुम्हाला त्या अॅपवर कुठे नोकरी आहे का, तुम्हाला कामात काही समस्या येत असेल तर ती सोडविण्यासाठी मदत करतात.
तुम्ही कुठे काम करता, काय काम करता याची ओळख लपवून ठेवली जाते. म्हणजे जर तुम्ही तुमच्या कामातील समस्येविषयी जरी कोणाचे मार्गदर्शन मागितले आणि जर तुमच्या बॉसनेच तिथे उत्तर दिले तरीही त्याला तुम्ही कोण हे समजू शकत नाही.
या अॅपवर पगारासारखे नाजूक विषयही हाताळले जातात. यामुळे हे अॅप बहुतांशदा चर्चेत असते. आतापर्यंत या अॅपवर ८३ हजारांहून अधिक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची नोंदणी आहे. या लोकांचे विषय, चिंतांबाबत अधिकाऱ्यांना माहिती देऊन कॉर्पोरेट निर्णयांवर देखील प्रभाव टाकला जातो.
ब्लाइंडची स्थापना २०१३ मध्ये सुंगुक मून आणि क्युम किम यांनी केली होती. २०१४ च्या सुरुवातीला ते दक्षिण कोरियामध्ये सुरू झाले होते. त्यानंतर २०१५ मध्ये अमेरिकेत लाँच करण्यात आले. ही कंपनी कॅलिफोर्नियातील सॅन फ्रान्सिस्को येथे आहे.
या अॅपवर कर्मचारी त्यांच्या कार्यालयातील समस्या, लैंगिक छळ, कंपनीतील समस्या आदींवरही चर्चा करतात. जेणेकरून इतर कंपनीतील कर्मचाऱ्यांना याची माहिती होते. यामुळे ते पुढील नोकरी बदलण्याचा वगैरे निर्णय घेऊ शकतात.